Search This Blog

Monday, 27 November 2017

लाईफलाईन एक्सप्रेस 21 दिवस जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत




तज्ञ डॉक्टरांकडून जिल्हावासियांच्या आरोग्य तपासणीचा बल्लारपूर येथे शुभारंभ
जनतेने मोठया प्रमाणात लाभ घेण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्वत:ची प्रकृती ठिक नसतांना सुध्दा जिल्हयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणा-या लाईफलाईन एक्सप्रेसचा शुभारंभ केला. 27 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत बल्लारपूर येथे भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने महेंद्र फायनान्सच्या सौजन्याने जिल्हयातील नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सर, कुटूंब नियोजन, डोळे, कान या संदर्भातील आजार तसेच दंत चिकित्सा, स्तन आणि गर्भाशयाचे कर्करोगाचे परिक्षण  आदींवर या सात रेल्वेडब्यांच्या लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेच्या या लाईफलाईन एक्सप्रेसचे आगमन झाले. गेल्या 26 वर्षापासून भारतीय रेल्वे, महेंद्र फायनान्स व इन्पॅकट इंडिया फाँऊडेशन यांच्यामार्फत दूर्गम भागातील जनतेला या आरोग्य एक्सप्रेसव्दारे सेवा दिली जाते. देशभरातील दूर्गम भागात ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अधिकची आरक्षित रेल्वे प्लॅटफार्म आहे. अशा ठिकाणी स्थानिक लोकांच्या प्रतिसादानुसार तज्ञ डॉक्टरांच्या चमूच्या मदतीने या एक्सप्रेसमध्ये आरोग्य सेवा दिली जाते. प्रामुख्याने मोती बिंदूची शस्त्रक्रीया, कानाच्या छोटया शस्त्रक्रीया, चष्म्याचे वाटप, मशीनचे वाटप, फाटलेल्या ओठांवरच्या शस्त्रक्रीया, कर्करोगावरची तपासणी व त्या संदर्भातील आवश्यक शस्त्रक्रीया या एक्सप्रेसमध्ये केल्या जाते. या ठिकाणी मुंबईच्या टाटा ट्रस्ट रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असते. तसेच गरजेनुसार स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली जाते. कॅन्सरसारख्या आजारामध्ये भारतातील सर्व कॅन्सर रुग्णालयातल्या तज्ञांची गरजेनुसार मदत घेतली जाते. क्लीस्ट शस्त्रक्रीयांसाठी संबंधीत रुग्णाला अन्यत्र हलविण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.
या एक्सप्रेसला सात रेल्वे डब्बे असून यामध्ये पहिला कोच संयपाकासाठी राखीव आहे. दुसरा कोच डॉक्टर व प्रशासकीय अधिका-यांसाठी राखीव आहे. तिस-या व चौथ्या कोचमध्ये अद्ययावत शस्त्रक्रीया रुम आहेत. पाचवा कॅन्सर डिटेक्शन कोच आहे. सहावा कुटूंबनियोजन कोच तर सातवा दंत चिकित्सेसाठी राखीव ठेवला आहे. 20 लोकांचा तज्ञ चमू या ठिकाणी काम करीत असून यामध्ये तज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. बल्लारपूर येथील बचत भवनाजवळून प्रवेशासाठी जागा निश्चित करण्यात आली असून याच ठिकाणी रुग्ण नोंदणी कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हयातील दूर्गमभागातील नागरिकांनी या आरोग्य तपासणी मोहीमेचा सकाळी 9 ते 5 या काळात लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आज या संदर्भातील औपचारीक उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हयातील नागरिकांनी या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. उदघाटनच्या कार्यक्रमाला आमदार नानाभाऊ शामकुळे, ॲड.संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, नगराध्यक्ष हरीष शर्मा, महेंद्र ॲन्ड महेंद्र कंपनीचे सुशिलसिंग, विनय देशपांडे, योगेश कुळकर्णी, इन्पॅक्ट इंडिया फॉऊडेशनचे अनिलप्रेम सागर दरशे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी श्रीमती टोंगे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून या आरोग्य सेवेचे रेल्वेस्थानकात उदघाटन केले. डॉक्टरांनी त्यांना भाषण न देण्याचा वैद्यकीय सल्ला दिला असून त्यांचे मनोगत रेल्वेस्टेशन ग्राऊड येथे झालेल्‍या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वाचून दाखविले.

000

No comments:

Post a Comment