Search This Blog

Saturday 7 December 2019

समाजाच्या उत्तम सेवेसाठी बँक व्यवस्थापन पुढे येत आहे : आर.सी. ठाकूर





v  बँक ऑफ इंडियाकडून एकाच दिवशी 35 कोटींचे वाटप
v  91 ऑटो चालकांना हक्काच्या घरांचे झाले वाटप
v  मुद्रा व अन्य योजनेतील लाभार्थ्यांचे सत्कार व स्वागत
चंद्रपूर दि 7 डिसेंबर : देशभरातील बँक समुदाय आता अतिशय ग्राहकाभिमुख होत असून समाजाच्या उत्तम सेवेसाठी बँक व्यवस्थापन पुढे येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अग्रणी बँक म्हणून काम करताना बँक ऑफ इंडियाने अतिशय उत्तम काम केले असून या भागातील सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने पुढे यावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक आर.सी. ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या ऑटोचालकांच्या घर वाटपाचे कर्ज मंजूरी आदेश देखील वितरीत केले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासन, बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक, जिल्हा परिषद, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जिल्हा नियोजन विभाग मुद्रा बँक समन्वय समिती अशा अनेक आस्थापनांच्या उपस्थित बँक ऑफ इंडिया या स्टार आरसेटी चंद्रपूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक आर.सी.ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक विनोद शेट्टीकर,उपविभागीय प्रबंधक सावंत देसाई, प्रेम कुमार कोडाली, यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजक व शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन केलेल्या ऑटोचालकांच्या हक्काच्या घरासंदर्भातील कर्ज मंजुरी आदेश 91 ऑटो चालकांना वितरित करण्यात आला. याशिवाय ब्युटी पार्लर पासून शेळीपालन, कुकुटपालन, दुचाकी वाहन दुरुस्ती, अगरबत्ती बनविणे, पापड, लोणचे ,मसाला पावडर बनविणे, कंप्यूटर अकाउंटिंग अशा विविध प्रशिक्षण कार्यक्रमातून पुढे आलेल्या उमेदवारांना कर्ज मंजुरी आदेश देण्यात आले. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतील लाभार्थ्यांना देखील कर्ज मंजुरी आदेश देण्यात आले. यावेळी महादेव अशोक हेपट, अब्राहम बापूराव मोहितकर, सचिन शंकरराव चरडे, वर्षा तुळशीदास लांजेवार, रौनक रिजवान शेख, ताई सुधाकर केळवतकर आधी यशस्वी उद्योजकांनी बँक ऑफ इंडिया मार्फत मिळालेल्या कर्जातून उभारलेल्या उद्योगाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी संबोधित करताना महाप्रबंधक आर.सी.ठाकूर यांनी बँकेचे स्वरूप बदलत असून अधिकाधिक ग्राहकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही बँकेचे आयुष्य कर्जदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असून त्यासाठी तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये आणि प्रत्येक योजनांमध्ये घेतलेले कर्ज परत करणाऱ्या वृत्तीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. योजनेतून एकाला मिळालेला लाभ दुसऱ्याला मिळण्यासाठी प्रत्येकाने वेळेत कर्ज परतफेड करण्याची सवय लावून घेतल्यास शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी एस.एन. झा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. सोबतच या परिसरात आता ॲग्रो -इंडस्ट्रियल अभियान सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही भागाच्या विकासाचे गमक हे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर अवलंबून असते. त्यासाठी बँक व संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी संबोधित करताना बेरोजगारी आणि मंदीच्या काळात बँकांचे लोन मिळणे अतिशय आवश्यक असून त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल एस.एन. झा व त्यांच्या टीमचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना बँकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी बँक व्यवस्थापनाचे देखील आभार मानले. लोकांना नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे व्यवहार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी एस.एन.झा यांनी गेल्या काही वर्षात बँक ऑफ इंडियाने शिखर बँक म्हणून जिल्ह्यांमध्ये केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. विविध शासकीय उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोन वितरित केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला विविध योजनांमधून उपक्रम सुरू केलेल्या लाभार्थी सोबतच शहरातील ऑटोचालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऑटो संघटनेच्यावतीने बँकेचे महाप्रबंधक आर. सी. ठाकूर तसेच जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचादेखील सत्कार करण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment