Search This Blog

Monday 13 January 2020

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील अपघात विरहित जिल्हा झाला पाहिजे : खा. सुरेश धानोरकर


31 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाला थाटात प्रारंभ
चंद्रपूर दि. 13 जानेवारी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा संदर्भातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था केली जाईल. मात्र चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील अपघात विरहित जिल्हा झाला पाहिजे, असे आवाहन खासदार सुरेश धानोरकर यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित 31 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि वाहतुकीच्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात मोठ्या प्रमाणात कपात होणे आवश्यक असून केवळ नियमांचे पालन नसल्यामुळे किंवा आवश्यक दुरुस्त्या अभावी कोणाचा जीव जाता कामा नये असे स्पष्ट केले.      
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यामध्ये अपघातांचे विश्लेषण करून अपघात प्रमाण स्थळांचा शोध घेणे महत्वाचे असून सध्या अपघाताचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्याचे आकडेवारी सांगितली. यामध्ये शून्य टक्क्‍यांपर्यंत कमी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळणारे राहुल कर्डिले यांनी यावेळी संबोधित केले त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वतः घ्यायची काळजी याबाबत सुद्धा जनजागरण झाले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित शाळेतील मुलांशी देखील त्यांनी संवाद साधतांना रस्त्यांच्या संदर्भातील नियमांना समजून घेण्याची आवाहन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कायद्याचे काटेकोर पालन रस्त्यावरील शिस्त लावण्यासाठी करण्याबाबत ट्रॅफिक पोलिसांना निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये त्यासंदर्भात काम करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या दरवर्षी जवळपास दीड लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात. पाच लाख अपघात दरवर्षी होतात. जवळजवळ पाच हजार लोक अपघातात अपंग होतात. दुर्दैवाने अपघातात मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट हे 18 ते 35 या दरम्यानचा आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष अपघातात दगावल्यास त्या घरावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे याबाबत जनजागृतीची आवश्यकता व्यक्त केली.
यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी एस.पी फासे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना रहदारीचे नियम न पाळल्याने अपघात घडत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वाहने अतिवेगाने चालविणे, दोन वाहनात अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे. आजारी असताना वाहने चालविणे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरणे. आदी चुका टाळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन मोंटू सिंग यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment