Search This Blog

Tuesday 28 January 2020

चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी 223.60 कोटी मंजूर : अर्थमंत्री अजित पवार


Ø  चंद्रपूर जिल्ह्यासाठी 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतूदीला अर्थमंत्र्यांची मंजूरी
Ø  नागपूर येथे अर्थमंत्र्यांच्या उपस्थित राज्यस्तरीय बैठक
Ø  मर्यादित नियतव्ययात आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश
Ø  घुगुस,भद्रावती व राजुरा येथे बॅरेजेस बांधण्यासाठी 19 कोटी मंजूर
Ø  विविध प्रकल्पातील थकीत वीज देयकाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

नागपूर, दि. 28 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 2020-21 वर्षासाठी निर्धारित केलेल्या 180 कोटी या नियतव्ययामध्ये 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मंजूर करीत पुढील वर्षासाठी 223.60 कोटीच्या जिल्‍हा वार्षिक योजनेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे मान्यता दिली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आणखी निधीची मागणी केली असून यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारुप आराखडा मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्री अनील देशमुख, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खासदार  सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले याशिवाय सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, तसेच विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधी व प्रस्तावित जिल्हास्तरीय योजनांबाबत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्याला 2020-21 या वर्षासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 180 कोटी नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात 425.38 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आजच्या बैठकीमध्ये सादर केली. तथापि, जिल्हा वार्षिक समितीच्या निकषानुसारच सर्व जिल्ह्यांना यावर्षी वाढीव निधी दिला जाईल असे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तिजोरीवर कर्जमुक्ती घोषणेमुळे अतिरिक्त ताण पडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला गरजेपेक्षा अधिक किंवा अती आवश्यकता असल्याशिवाय निधी देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, पालकमंत्री, खासदार, आमदार व बैठकीत उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील रस्ते, अंगणवाडी इमारत, पोलीस व अन्य विभागाची वाहने खरेदी व अन्य बाबींसाठी निर्धारित 180 कोटी व्यतिरिक्त 43. 60 कोटी निधी अतिरिक्त देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
तथापि, या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या काही महत्वाच्या अन्य मागण्यांवर मंत्रालयात मंत्री स्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या बैठकीमध्ये सीएसआर फंडाच्या संदर्भात जिल्हास्तरीय नियोजन करताना चौकट आखण्याची मागणी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. अर्थमंत्र्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी नियंत्रण ठेवावे ,असे निर्देश दिलेत.
जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात निधी मागण्यात आला. यासंदर्भात बोलताना अर्थमंत्र्यांनी मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात यासंदर्भात निधी उपलब्ध असून केंद्र शासनाकडून हा निधी मिळत असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत अत्यंत आवश्यक असेल त्याच ठिकाणी या निधीचा वापर करण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील विविध कार्यालयाच्या संदर्भात 64 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी मांडली. अतिशय आवश्यकता असेल त्याच ठिकाणी यासंदर्भात कार्यवाही व्हावी व त्या-त्या विभागामार्फत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष वेधावे अशा सूचना अर्थमंत्र्यांनी केल्या.
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ व अंगणवाडी आयएससो करण्याच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्याने केलेल्या वेगळ्या कामाची माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या या कामकाजाचे अभिनंदन करीत कौतुक केले.
वीज वितरण कंपनीला सौर व अन्य वीज पंप मिळण्यासाठी जिल्हा नियोजन मधून पैसे देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलतांना अर्थमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीला वीज पंपासाठी निधी देण्यासाठी निर्देश देण्यात येईल असे स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती रस्त्याच्या दिवाबत्ती संदर्भातील थकित निधी देण्यास असमर्थ असल्याचे निर्देशास आणून दिले. यापूर्वी हा निधी जिल्हा परिषदेमार्फत दिला जात होता. सध्या ग्रामपंचायत हा निधी आपल्या कर वसुलीतून भरत असल्यामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आणून दिले.तथापि, या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत सूचना अर्थमंत्र्यांनी केली
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात प्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दिवाबत्तीसाठी नव्या नळ योजनांना वीज जोडणी देण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा ,अशी मागणी यावेळी केली.
आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यांनी जिल्हा परिषदेमार्फत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी अतिशय अल्प निधी उपलब्ध असल्याबाबतची बाब लक्षात आणून दिली.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शेवटी दीडशे कोटी रुपये अधिक देण्यात यावे अशी, मागणी केली. मात्र जिल्ह्याचे क्षेत्रफळ व अन्य नियमानुसार जिल्ह्याचा नियतव्यय ठरलेला असून त्यामध्ये वाढ करण्याची सध्या राज्य शासनाची स्थिती नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तथापि, यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी जिल्ह्यातील वर्धा नदीवर बॅरेजेस बांधण्याबाबत या बैठकीत मागणी केली. जिल्ह्याच्या वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, घुग्घुस, राजुरा या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे त्यांनी अर्थमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
अर्थमंत्र्यांनी ही बाब अतिशय गंभीरतेने घेत संबंधित विभागांच्या सचिवांना यासंदर्भात बैठकीतून दूरध्वनी लावत भद्रावती, घुग्घुस व राजुरा येथील तीन बॅरेजेसला तात्काळ मंजुरी दिली. यासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा यावेळी केली.
राजुरा येथील विमानतळाला जमीन हस्तांतराची समस्या असून हे विमानतळ भद्रावती नजीक केंद्रशासनाच्या वापरात नसलेल्या जागांवर उभारण्याची मागणी देखील या बैठकीत खासदार धानोरकर यांनी केली. यासंदर्भात अमरावती ,अकोला येथील विमानतळाच्या चर्चेच्या वेळी निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
चांदा ते बांदा या योजनेला कालावधी वाढवून देण्याबाबत मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन डॉ.कुणाल खेमनार यांनी केले.
0000000

No comments:

Post a Comment