Search This Blog

Saturday 25 January 2020

चंद्रपूरच्या क्रीडा वैभवामध्ये भर घालण्यासाठी अद्यावत क्रीडा संकुलाचा उपयोग व्हावा : विजय वडेट्टीवार




चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी तयार होत असलेले हे नवे रनिंग ट्रॅक नव्या खेळाडूंच्या निर्मितीसाठी पूरक ठरावेत. या माध्यमातून जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर पडावी, अशा शुभेच्छा राज्याचे मदत व पुनर्वसन, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिल्या.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलावर नव्या सिंथेटिक धावनपथाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते बोलत होते. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चंद्रपूर शहरात अशा पद्धतीचे पहिलेच सिंथेटिक धावनपथ या माध्यमातून निर्माण होणार आहे. यावेळी व्यासपीठावर चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा संकुलासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधी देखील आपण मंजूर करू. जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रीडांगण असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता पडणार नाही. मात्र या सर्व सोई सुविधांचा फायदा क्रीडापटूंना व्हावा व चंद्रपूरच्या नावलौकिकात भर पडावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
खासदार सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूर येथे उत्तमात उत्तम धावपटू तयार होण्यासाठी या नव्या ट्रॅकचा वापर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलताना चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील हे सर्वात मोठे क्रीडांगण असून या क्रिडांगणाला सर्वात अद्यावत बनविण्याचा आपला मानस असून त्यासाठी पालकमंत्र्यांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले यासोबतच त्यांनी घुगुस येथील क्रीडा संकुलात बाबतही मदत करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांनी केले. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते. त्यांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment