Search This Blog

Friday 17 January 2020

नियोजन भवनातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाच्या कामकाजाला प्रारंभ



Ø ना.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची परिचय बैठक
Ø 20 जानेवारीला पाहिली आढावा बैठक
चंद्रपूर दि. 17 जानेवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर मुख्यालय येथील पालक मंत्री कार्यालयाचा आज शुभारंभ केला. विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे काल या ठिकाणी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचे स्पष्ट केले. आज आपल्या पालकमंत्री कार्यालयाचा नियोजन भवनात शुभारंभ केला.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. याशिवाय विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री दालनाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची देखील पाहणी केली. या ठिकाणी जिल्हा स्तरीय कार्यालय सुरू होणार आहे.
त्यानंतर त्यांनी नियोजन भवनात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीचे संचलन जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ यांनी केले. जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येक विभाग प्रमुखाच्या कामकाजाची यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी काही प्रमुख कामांबद्दल विचारपूस केली 20 जानेवारी रोजी विभाग निहाय आढावा घेणार आहेत तर 25 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन विभागाची बैठक होणार आहे.
आजच्या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 चे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे यांनी या वेळी सादरीकरण केले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 90 टक्के आधार कार्ड शेतकऱ्यांनी बँक खात्याशी संलग्न केले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यांमध्ये 60 हजार 800 पात्र खाते असून त्यापैकी 59 हजार खात्यांचे आधार कार्ड बँक खात्याची संलग्न करण्यात आले आहे. यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी व खात्याची तपासणी पूर्ण होईल. यासंदर्भातील अहवाल देखील या वेळी ज्ञानेश्वर खाडे यांनी सादर केला.
000000

No comments:

Post a Comment