Search This Blog

Monday 20 January 2020

सोयाबीन व कापसावर आधारित उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका : विजय वडेट्टीवार




नंदोरी येथे जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचे शानदार आयोजन
चंद्रपूर दि. 20 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन व कापूस यावर आधारित उद्योग व्यवसायांना चालना देण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्मार्ट योजनेअंतर्गत प्रत्‍येक जिल्ह्यात अधिक पेरा असणाऱ्या पिकांवर आधारित क्लस्टर तयार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे  चंद्रपूर जिल्हयात सोयाबीन व कापूस पिकावर आधारीत उद्योग उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेमार्फत 20 जानेवारी रोजी भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना जवळ जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. पालक मंत्री विजय वडेट्टीवार या प्रदर्शनीचे उद्घाटन केले. प्रदर्शनीमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय या संदर्भात जिल्हयातील मान्यवर व यशस्वी शेतकरी तसेच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्याताई गुरनुले होत्या. खासदार सुरेश धानोरकर , आ. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावजी भोंगळे, उपाध्यक्ष रेखाताई कारेकर, सभापती नितू चौधरी, सभापती सुनील उरकुडे, सभापती नाजुका मंगाम, नंदोरीच्या सरपंच अनिताताई पावडे, प्रकाश देवतळे, रमाकांत श्रीधर लोधे, नरेंद्र जीवतोडे, ज्योती वाकडे, सुनंदा जीवतोडे, गौतम निमगडे याशिवाय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बी.डी. राजपुत, विश्वास संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. उल्हास निमकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, तहसिलदार महेश शितोडे, यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना नरेंद्र जीवतोडे यांची उपस्थिती होती.
या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, याशिवाय विविध महिला बचत गटांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते.
देशी गाय , संकरित गाय , शेळी मेंढी, म्हैसगट, बैलजोडी गट, कुक्कुट गट, संकरीत कालवडी गट, अशा विविध गटांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची प्रदर्शनी लावली होती. या ठिकाणी कुक्कुट गटांमध्ये कोंबड्यांच्या विविध प्रजातीचे देखील प्रदर्शन उल्लेखनीय होते. याशिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या कृषी यांत्रिकी वापरा मधील नव्या यंत्रांची देखील या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आले होते. आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबतच्या मार्गदर्शनाचा संदर्भात ही यंत्रे सगळ्यांची लक्ष वेधून घेत होते.
कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना नरेंद्र जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात सलग तीन वर्ष अशा पद्धतीची अभिनव प्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे. वरोरा ,भद्रावती नंतर यावर्षी नांदोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कौतुक केले. 
यावेळी बोलताना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना देखील या दोन लाखाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची जोडधंदा करण्याचा पुरस्कार केला. नागपूर सारख्या शहरांमध्ये दररोज दोन लाख लिटर दुधाची मागणी आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध पुरवल्या जात नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा अतिशय पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना ठरू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार सुरेश धानोरकर यांनी देखील यावेळी संबोधित केले. वर्षानुवर्षे शेती हा आपला परंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आम्हाला उत्तम जाण असून त्या सोडवण्यासाठी सत्तेचा वापर करू ,असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील यावेळी संबोधित केले. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जोडधंदे उपलब्ध व्हावे,असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी देखील यावेळी जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वापरण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विविध योजनातून मिळणाऱ्या निधीला वाढवून दयावे,अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना जिवतोडे, संचलन प्रशांत कऱ्हाडे, तर आभार प्रदर्शन डॉ. अविनाश सोमनाथे यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment