Search This Blog

Monday 20 January 2020

चांदा ते बांदा योजना यापुढेही सुरू राहणार : विजय वडेट्टीवार

द्रपूरसह सिंधुदूर्ग जिल्हयातूनही योजना सुरु ठेवण्याची मागणी
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : चंद्रपूर व सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांमध्ये परंपरागत उद्योग व कृषीवर आधारित जोड धंद्यांना चालना देऊन लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तयार करण्यात आलेली चांदा ते बांदा ही योजना या पुढेही सुरू राहील. ही योजना बंद करण्यात आल्याची अफवा असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
2016 -17 ते 2019-20 या कालावधीत चंद्रपूर व सिंधुदुर्ग या खनिज व नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या जिल्ह्यामध्ये परंपरागत व्यवसायांना चालना देऊन सामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्याच्या योजनेला बंद करण्यात आल्याची अफवा जिल्ह्यामध्ये आहे. मात्र शासन स्तरावर चांदा ते बांदा ही योजना बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसून ही योजना यापुढेही सुरू राहील, असे स्पष्ट प्रतिपादन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. नंदोरी येथे पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते चंद्रपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
चांदा ते बांदा ही योजना गेल्या चार वर्षांपासून सुरू असून या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे कोटींच्या वरती वेगवेगळी कामे करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यमंत्री नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात ही योजना सुरु करण्यात आली. या समितीमार्फत दरवर्षी वार्षिक आराखडा मंजूर करण्यात येत होता. तथापि, राज्यातील सत्ता बदलानंतर ही योजना बंद केली जाणार अशा पद्धतीचे वृत्त काही वर्तमानपत्रांमध्ये उमटले होते. याबाबत वडेट्टीवार यांनी आज खुलासा केला.
तथापि, हे वृत्त खोटे असून यापुढेही ही योजना सुरू राहील. या योजनेच्या मार्फत जिल्ह्याचा समतोल विकास साधला जाईल, या योजनेची आतापर्यंतची समीक्षा करून लाभापासून वंचित असणाऱ्या अन्य तालुक्यांमध्ये देखील या योजनेचा प्रचार प्रसार व अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत कृषी, फलोत्पादन, पर्यटन, पशु विकास, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय, वने व पर्यावरण, जलसंधारण, ग्रामविकास आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहे. यासंदर्भातील प्रशिक्षण व योजनांची अंमलबजावणी ही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. यापुढेही आता सुरू राहणार आहे असे, त्यांनी स्पष्ट केले.
00000

No comments:

Post a Comment