Search This Blog

Monday 20 January 2020

संशोधनाभिमुख शिक्षणाची आज खरी गरज : विजय वडेट्टीवार





Ø  जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनीला सुरुवात
Ø  चंद्रपूर ,वर्धा ,गडचिरोली जिल्ह्यातील 295 विद्यार्थ्यांचे सादरीकरण
Ø  दिल्लीमध्ये मॉडेल सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांला पालकमंत्र्याकडून 51 हजारांचा पुरस्कार
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाला अधिक महत्व देणे गरजेचे असून आजचे शिक्षण हे संशोधनाभिमुख होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये चंद्रपूर , वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत इन्स्पायर अवॉर्ड योजना 2019-20 अंतर्गत नव्या जिल्हास्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत जिल्हा ,राज्य व केंद्र अशा तीन स्तरावर विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी मिळते. समाजाला उपयोगी ठरेल अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाला या माध्यमातून पुढे आणण्याचा उद्देश केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा आहे. चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्‍या अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्याताई गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, विशेष अतिथी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपुरचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील, प्रकाश देवतळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेन्द्र लोखंडे, शिक्षणाधिकारी निरंतर मोहन पवार ,तसेच सैनिकी शाळेचे प्राचार्य नरेशकुमार यावेळी उपस्थित होते
यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती आपल्यामध्ये जोपासावी. समाजाचे व्यापक हित लक्षात घेणारे संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले .यामध्ये कृषी, पशुसंवर्धन या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असून त्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठे संशोधक घडण्याची क्षमता आहे. मात्र स्थानिक स्तरावर त्यांना तसे वातावरण मिळत नाही. नासामध्ये गेलेले भारतीय मोठ्या प्रमाणात आपले संशोधन जगाला दाखवू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना विदेशी संस्थांची मदत घ्यावी लागते. देशपातळीवर देखील मोठ्या प्रमाणात आपले पेटंट निर्माण झाले पाहिजे.आपल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली पाहिजे,असे प्रतिपादनही त्यांनी केले.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये आपल्या मोडेल सादर करण्याची संधी भेटणार आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अशा पद्धतीने विद्यार्थी यशस्वी झाल्यास त्याला 51 हजार रुपये व्यक्तिगतरीत्या दिले जाईल अशी घोषणा यावेळी केली. सैनिकी शाळेच्या आरक्षणामध्ये ओबीसींना देखील प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीमती हु.नो. मस्के यांनी केले. 20, 21, 22 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर, तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
0000000

No comments:

Post a Comment