Search This Blog

Thursday 16 January 2020

सूक्ष्म सिंचनातून चंद्रपूर जिल्ह्याच्या अर्थकारणाला कलाटणी मिळू शकते : संजय वैद्य


चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मुल येथे मेळावा
चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : सूक्ष्म, सिंचनातून चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट शक्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पाणी वापराचे तंत्र मंत्र समजून घेणे गरजेचे असून एका वर्षात चार ते पाच पिकांसाठी सिद्ध होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध जलतज्ञ, संजय वैद्य यांनी केले.मुल येथे आयोजित चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
जिल्हा प्रशासनाच्या मार्फत चांदा ते बांदा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील या योजनेच्या मेळाव्यातील पहिला मेळावा मुल येथील तहसील कार्यालयामध्ये आज घेण्यात आला होता.
या मेळाव्याला उद्घाटक म्हणून तहसीलदार डी.जी.जाधव उपस्थित होते.या कार्यक्रमाला मार्गदर्शक जल अभ्यासक संजय वैद्य, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सोनेकर, पशुधन विकास अधिकारी संतोष गवारे,सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ज.ज बळकटे, टाटा ट्रस्ट्रचे  कृषी तज्ञ तथा तालुका समन्वयक चेतन डाहे, लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका देवेंद्रा मेश्राम उपस्थित होते.
चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत शेतकरी सुशिक्षित बेरोजगार उद्योग व्यवसाय अभिरुची ठेवणाऱ्या तरुणांचा व महिलांचा मेळावा चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मूल येथे तहसिल कार्यालयात 16 जानेवारीला पार पडला.
यावेळी बोलताना जलतज्ञ संजय वैद्य यांनी पाण्याची बचत व त्यातून समृद्धी याबाबतचे मार्गदर्शन केले ते म्हणाले,पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे झाले असून शेतीला सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात अधिकाधिक उत्पन्न   शेतकऱ्यांनी घ्यावे. 
शेतामध्ये पाण्याचा उपयोग करताना योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतीला आवश्यक असेल तेवढेच पाणी देणे गरजेचे असताना शेतकरी अव्याहतपणे पाणी देत असल्यामुळे उत्पादनात आवश्यक तेवढी वाढ होत नाही. त्यामुळेच, शेतीत आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने  शेतीच्या उत्पादनात वाढ होते. तसेच खर्चाची बचत होते. शेतीला आवश्यक तेवढे पाणी मिळते.  
पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सोनेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चांदा ते बांदा योजनेतून चिचाळा लगतच्या सहा गावातील शेतीला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेसाठी 27 कोटी रुपये मंजूर आहे. पाइपलाइनद्वारे शेतीला सिंचन व्यवस्था करणारी ही विदर्भातील एकमेव आणि पहिली योजना असून या योजनेमुळे पंधरा हजार हेक्‍टरवरील शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती सोनेकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय कसा आणि कोणत्या पद्धतींनी करावा याबाबतची सविस्तर माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ज. ज.बळकटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिली. पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष गवारे यांनी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय कसा करावा तसेच पशुपालन आतून सातत्यपूर्ण उत्पन्न कसे मिळेल याचेही सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच टाटा ट्रस्टचे कृषी तज्ञ तालुका समन्वयक उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचन मल्चिंग व आच्छादन, पॉलिहाऊस नर्सरी, कृषी यांत्रिकीकरण, उस्मानाबादी बोकड वाटप, समूह सिंचन विहीर, विहिरीची दुरुस्ती यासारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चांदा-बांदा विभागाचे युवा व्यावसायिक अमोल घुगुल, जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय जाधव यांनी सहकार्य केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय उराडे तर आभार सुधीर आत्राम यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment