Search This Blog

Saturday 25 January 2020

बळकट लोकशाहीसाठी आदर्श मतदान पद्धतीचा पुरस्कार झाला पाहिजे : जिल्हाधिकारी





जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : या देशाची बळकटी ही सशक्त लोकशाहीमध्ये आहे. ही बाब प्रत्येक मतदाराला समजेपर्यंत आपल्याला काम करणे आवश्यक आहे. मताधिकार बजावण्यासाठी जनतेमध्ये उत्साह निर्माण करणे. निवडणुकांसारख्या लोकशाहीच्या उत्सवातून जनतेमध्ये यासंदर्भात आत्मीयता निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.
जिल्हा प्रशासनातील निवडणूक विभागाच्या पुढाकारातून आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. तत्पूर्वी आज सकाळी संपूर्ण चंद्रपूर शहरामध्ये सकाळी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. ही रॅली गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगानी सुद्धा आपली उपस्थिती दाखविली.
आजच्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.पी.लोंढे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियंका पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकुमार पुजार उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी निवडणुकांमध्ये धर्म, वंश, जात, भाषा, समाज अशा कोणत्याही घटकांचा प्रभाव दिसता कामा नये. यासाठी अतिशय निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखणे हे निवडणूक कर्मचाऱ्यांचे काम असते. हे काम केवळ शासकीय काम म्हणून न करता एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याची भूमिका नेहमी शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
यामुळेच लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत अतिशय उत्तम काम जिल्ह्यातील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी केले आहेत. यामध्ये ऐन वेळेवर मोठ्या प्रमाणात मदत करणारा शिक्षक वर्ग असुद्या व शिक्षकेत्तर कर्मचारी असुद्या किंवा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी असुद्या या सर्वांनी जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय निष्ठेने आणि कर्तव्य भावनेतून काम केल्यामुळेच उत्तम प्रकारे आपण या निवडणुका पार पाडू शकलो. यासाठी मी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यावेळी म्हणाले की, आज देशभरात हा दिवस साजरा होत आहे. राष्ट्रीय कर्तव्य अतिशय सक्षमपणे पार पाडल्याच्या भावनेला वृद्धिंगत करण्यासाठी आजच्या दिवशी चिंतन करणे गरजेचे आहे. या देशाची लोकशाही बळकट करणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक काम हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच प्रत्येक कर्मचाऱ्याने पार पाडणे गरजेचे आहे. हे अतिरिक्त काम नसून हे आपले कर्तव्यच आहे याची जाण ठेवून या कामाचे स्वागत निवडणूक कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम काम करणाऱ्या काही प्रमुख विभागांचे विशेष नामोल्लेख करून कौतुक केले. आगामी काळामध्ये जिल्ह्यांमध्ये मतदान नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी केले तर संचलन श्रीमती संतोषवार, आभार प्रदर्शन नायब तहसिलदार साळवे यांनी केले.
तत्पूर्वी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व दौंड स्पर्धा यामध्ये विजयी झालेल्‍या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याशिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम करणारे मुख्य लेखाधिकारी अशोक माटकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव, प्रभाकर गिज्जेवार, तहसीलदार रवींद्र होळी लिपीक सोनाली अशोक लांडे, निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे, अमर श्रीरामे, नायब तहसीलदार एम. बी. जोगदंड, अमोल करपे, नायब तहसीलदार सागर कांबळे, वसंत पर्वते, नायब तहसीलदार व्ही आर दरबे, यु एम लोखंडे, नायब तहसीलदार रमेश कोळपे, शंकर भांदककर, विक्रम आर. येल्ला, डी. एस. बल्की, प्रशांत गटलेवार, गीता आंबोरकर, पुरुषोत्तम येलसेट्टीवार, घनश्याम तिवारी आदींचे देखील यावेळी स्वागत झाले.
0000

No comments:

Post a Comment