Search This Blog

Sunday 26 January 2020

प्रशासन आणखी लोकाभिमुख करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री आपल्या दारी योजना : विजय वडेट्टीवार






विविधांगी कार्यक्रमांनी चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविधांगी कार्यक्रम आज चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर साजरे करण्यात आले.यावेळी संबोधित करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासन आणखी लोकाभिमुख करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 'पालकमंत्री आपल्या दारी ' ही योजना राबविण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
आज सकाळी नऊ वाजता राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात झेंडावंदन नंतर उपस्थित समुदायाला संबोधित केले. त्यांनी पालकमंत्री आपल्या दारी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील समतोल विकासासाठी महिन्यातून चार दिवस संपूर्ण जिल्हा प्रशासन तालुक्यातील एखाद्या गावांमध्ये यंत्रणा घेऊन जाईल. प्रत्येक तालुक्यात मोठे मेळावे या अंतर्गत घेतले जातील. सिंदेवाई तालुक्यातील नवरगाव येथून पालकमंत्री आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी आज केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आज त्यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी राज्यशासनाने सुरू केलेल्या शिवभोजन या योजनेची सुरुवात केली. तर आजपासूनच जिल्ह्यांमध्ये खाण पर्यटन सुरू झाल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
आज सकाळी पोलीस मैदानावर जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त झालेले मान्यवर, जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, राजकीय ,सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन या मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खासदार सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह  प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आपल्या मुख्य भाषणात पालकमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ पुढील मे महिन्यापर्यंत मिळालेला असेल असे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यासोबत आधार कार्ड संलग्न करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ 692 खात्यांचे काम बाकी राहिले आहे. त्यामुळे ही योजना शंभर टक्के  यशस्वीपणे राबविली जाईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.
शेतकऱ्यांच्या शेतीतील खर्च आणि उत्पन्न यावर आधारित नफ्याची रक्कम वाढावी. यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ' स्मार्ट 'योजनेची काटेकोर अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांची स्थापना करून या संघटनांना खाजगी कंपन्यांची थेट जोडण्याचे काम केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500 रुपये भाव मिळत असून धान खरेदी केंद्र व्यवस्थित सुरू राहतील, याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय कापूस व सोयाबीन पिकांवर आधारित उद्योग आगामी पाच वर्षात निर्माण केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त गावांना आरो युक्त पाणीपुरवठा करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ताडोबाच्या पर्यटनाला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने  येतो. मात्र हा पर्यटक चंद्रपूर जिल्ह्यात निवासी राहावा. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाला येत असलेल्या सध्याच्या मर्यादेला लक्षात घेता लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन या ठिकाणच्या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये प्रदूषण वाढीबाबत भारतामध्ये चौथा क्रमांक असलेल्या चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्याबाबत उपाययोजना शोधण्यासाठी एका समितीची घोषणा त्यांनी आज केली. या समितीच्या अहवालावरून प्रदूषण कमी करण्याचे धोरण तयार केले जाईल ,असे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती ,जमाती ,सोबतच विमुक्त जाती,भटक्या जमाती ,यांच्यासाठी आश्रम शाळा उभारणे,तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविणे,अपंग व विधवा परितक्त्या यांच्यासाठी जिल्ह्यात 1 हजार घरे उपलब्ध करणे, ओबीसी तरुणांना 1 लाखांचा वित्तपुरवठा, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळकटी,मेडिकल कॉलेजची प्रलंबित इमारत लवकरच पूर्ण करणे, जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन व कृषी यांत्रिकीकरणामध्ये संख्यात्मक वाढ करणे, जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या ॲनिमिया मुक्त भारत अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ,राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रम योजना, विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्व शाळांना एलपीजी गॅस पुरवणे, शाळा धूर मुक्त करण्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना ही यापुढे देखील सुरू राहील मात्र या योजनेची व्यापकता वाढविण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मध्ये कामगिरी करणाऱ्या किरण बगमारे यांचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल गौरवोद्गार आपल्या भाषणात काढले.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या पहिल्या भाषणांमध्ये गेल्या सरकारने सुरू केलेल्या चांगल्या कामांना यापुढेही सुरु ठेवले जाईल. समतोल विकासासाठी सर्वांच्या सहभागाची देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचलन मोंटू सिंग, मोहम्मद एजाज रिजवी व मंगळा असूदकर यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment