Search This Blog

Monday 13 January 2020

सर्व शेतकऱ्यांनी आपआपल्या बँकेमध्ये आधार कार्डची माहिती जमा करावी : राहुल कर्डिले

जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 13 जानेवारी : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना व्हावा यासाठी व्यापक मोहीम राबविली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार कार्ड सोबत जोडले गेले अथवा नाही याबाबत शाश्वती नाही. त्याची चौकशी करावी व ज्यांचे बँक खाते जोडले गेले नसेल त्यांनी आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत आपआपल्या बँकेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. या योजनेसाठी कोणत्याही अटी व शर्ती नाहीत. मात्र आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपले खाते आधार कार्डची जोडल्या गेले,अथवा नाही याची खात्री करणे अतिशय आवश्यक असून यासंदर्भात नजीकच्या बँकेला तातडीने भेट देऊन खातरजमा करावी ,अशी विनंती त्यांनी शेतकरी बांधवांना केली आहे.
सहकारी बँकेमध्ये ज्यांचे खाते आहे, त्यांनी सोसायटीचे सचिव किंवा संबंधित बँक शाखा यांच्याकडे आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी. तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या खात्यांसाठी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे सध्या जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार आहे. आज त्यांनी या योजनेसंदर्भातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात घेतली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद केलेली आहे. मात्र तरीही अनेक शेतकरी यासंदर्भात अनभिज्ञ असून त्यांनी तातडीने आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 ची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्यावतीने भरून त्यांना कर्ज मुक्त करण्यात येणार आहे. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याज असलेले थकबाकीची रक्कम सुद्धा या योजनेसाठी पात्र असेल. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 पासून योजनेचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येईल.
त्यापूर्वी सदर योजना यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी,सर्व बँका जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अधिकारी कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले आहे. 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment