Search This Blog

Thursday 16 January 2020

चलो कोठारी... ! चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळावा

चंद्रपूर, दि. 16 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांना गती देणाऱ्या चांदा ते बांदा योजनेतून शेतकरी,सुशिक्षित बेकार, महिला,उद्योग-व्यवसायी,जोडधंदा करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ग्रामपंचायत कोठारी तालुका बल्लारपूर येथे 17 जानेवारी रोजी चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळावा होणार आहे. या मेळाव्याला गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा प्रशासन अंतर्गत येणाऱ्या चांदा ते बांदा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या संधी व त्यातून गाव पातळीवर निर्माण होणारे रोजगार,व्यवसाय प्रकल्पाला मिळणारी चालना व नवीन प्रकल्पासाठी मिळू शकणारी मदत यावर  विविधांगी चर्चा या मेळाव्यामध्ये केली जाणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन  तहसीलदार जे.बी.पोहनकर,मुख्याध्यापक जनता‌ विद्यालय डॉ.विजय मसराम यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी एल. वाय. पोवरे, गट विकास अधिकारी किरणकुमार धनवडे, सरपंच ग्रामपंचायत कोठारी मोरेश्वर लोहे, उपसरपंच ग्रामपंचायत कोठारी  सायत्राताई मोहुर्ले, पराग ट्रेडर्स कृषी केंद्र, कोठारी स्नेहल टिंबडिया हे असणार आहे.
या मेळाव्यामध्ये तालुका कृषी अधिकारी शुभांगी मोहितकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.दामोदर गुरनुले, कृषी पर्यवेक्षक वरभे, पर्यवेक्षिका बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर योगिता साठवणे, तालुका समन्वयक टाटा ट्रस्ट यश दुधे, कृषी तज्ञ खेमराज गेडाम तसेच,प्रगतिशील व्यवसायिक व प्रगतिशील शेतकरी यांच्याकडून मार्गदर्शन लाभणार आहे.
सकाळी 11 वाजता डॉ.आंबेडकर - फुले सभागृह  ग्रामपंचायत कोठारी तालुका बल्लारपूर येथे होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने व्यवसाय उत्सुक व शेतीमध्ये प्रयोग करण्याची आवड असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment