Search This Blog

Sunday 5 September 2021

विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार















विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार

                  - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø  तालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन

चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर :  गत दोन  वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’  म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून ती पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ब्रम्हपूरी क्षेत्राचा कायापालट झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपूरी शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नवीन इमारतीचे व शासकीय विश्रामगृहाच्या कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, नागभीड पंचायत समिती सभापती प्रफुल खापर्डे स्मिता पारधी, खेमराज तिडके, प्रा. राजेश कांबळे, प्रभाकर सेलोकर, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, प्रकाश देवतळे, ज्ञानेश्वर कायरकर, मंगला लोणपल्ले, उपअभियंता अरुण कुचनवार आदी उपस्थित होते.

राज्याचा मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूरच्या सर्वांगीन विकासासाठी आपण कटिबध्द आहोत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपूरी क्षेत्रात 75 हजार हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे शेतजमीन सुपिक होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागाचे रस्ते शहरासोबत जोडून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भागाच्या विविध विकासकामांच्या 100 कोटींच्या निविदा येत्या आठवड्याभरात निघणार आहे. भविष्याचा विचार करता ब्रम्हपूरी एक नामांकित शहर म्हणून उदयास येईल.

येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाकरीता 16 कोटी मंजूर झाले आहेत. नगर परिषदेची इमारत पूर्णत्वास आली आहे. 100 खाटांचे रुग्णालय, ई-लायब्ररी, सात कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकूल, उड्डाण पुलासाठी 75 कोटी, शासकीय अधिकारी – कर्मचा-यांच्या निवास स्थानासाठी 20 कोटी मंजूर झाले आहे. तसेच वडसाकडे जाणारा अंतर्गत रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी 90 कोटींचे नियोजन करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी स्विमिंग पूल, बगिचा, शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 75 लक्ष रुपये देण्यात आले आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे दोन वसतीगृहे सोडून विद्यार्थ्यांसाठी इतर चार नवीन वसतीगृहे बांधण्यात येत आहे. त्यामुळे 650 विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच येत्या काही दिवसांत तीन फिरत्या दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात येणार असून सदर दवाखाने सुसज्ज वाहनांसह गावागावात जावून तपासणी करणार आहे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

 

 रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे लोकार्पण : स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत ब्रम्हपूरी नगर परिषदेला देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वासेकर, हितेंद्र राऊत, नितीन व-हाडे आदी उपस्थित होते.

    

भुमिपूजन करण्यात आलेली इतर विकासकामे : ब्रम्हपूरी शासकीय विश्रामगृह परिसरात सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची नवीन इमारत (2 कोटी रुपये), शासकीय विश्रामगृहाची नवीन इमारत (3 कोटी 38 लक्ष रुपये), जुगनाळा येथे मालडोंगरी, चौगान, जुगनाळा, मुई, गांगलवाडी, वायगाव, गोगाव, सांयगाव रस्ता बांधकाम (6 कोटी रुपये), पारडगाव येथे अंतर्गत्‍ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण  (50 लक्ष रुपये), रणमोचन येथे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (80 लक्ष रुपये) आणि रुई येथे वाल्मिकी परिसरातील सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन.

0000000

No comments:

Post a Comment