Search This Blog

Tuesday, 4 August 2026

जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन


 जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूर, दि.04 : खेलो इंडिया उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता 8 ऑगस्ट रोजी खेळाडू निवळ  चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.          यापुर्वी ही चाचणी 30 जुलै 2026 रोजी ठेवण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सदर चाचणी रद्द करण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी खेळाडूंची निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.

14 वर्षे आतील मुले /मुली  यांनी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. खेळाडूचा जन्म 30 जुलै 2013 ते 30 जुलै 2015 या कालावधीत असावा. उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्म दाखला प्रत सोबत आणावे. खेळाडूंनी पासपोर्ट साईज 2फोटो सोबत आणावे.

उपरोक्त निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील व महानगरपालिका शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करून चाचणीच्या दिवशी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो.न. 9423673232) व खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे (मो.न. 7798174435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

००००००

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाईल्ड हेल्पलाईन , बाल कल्याण समिती त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

बालविवाह प्रतिबंध, बालकामगार माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत योजनांची माहिती जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तालुका बाल संरक्षण समिती, ग्राम तथा वार्ड बाल संरक्षण समिती संख्याबाबत माहिती तसेच जिल्ह्यातील बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांचे समक्ष व पोलिसांमार्फत येणाऱ्या  केसेसची माहिती सादर करण्यात आली.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, अतिश चव्हाण, सायली पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, तसेच व्ही.सी. माध्यमातून सर्व तहसिलदार विधी सेवा प्रा., अधिक्षक, समाजकल्याण व बाल कल्याण समितीचे सर्व सदस्य, बाल न्याय मंडळ सर्व सदस्य उपस्थित होते.

००००

Saturday, 1 August 2026

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव


 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव

चंद्रपूर, दि. 01 : महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त आज (शनिवार) जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी  विशालकुमार मेश्राम यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी, महसूल विभाग हा शासनाचा सर्वाधिक लोकाभिमुख विभाग असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असंख्य जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, जनगणना, निवडणुका, अतिक्रमण प्रकरणे, पट्टे वाटप, नियमाकूल प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्ते योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध कामांद्वारे महसूल विभाग नागरिकांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरी असो वा ग्रामीण भाग, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार आणि उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी हे अधिकारी-कर्मचारी चोवीस तास तत्परतेने कार्यरत असतात. कोणत्याही अडचणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्वरित प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्यांचे प्रथम प्राधान्याने निराकरण करण्यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनीही उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्याची माहिती दिली.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, संजय गांधी योजनेचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक महसूल अधिकारी  अजय मेकलवार यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, आशा सेविका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ अभियानाला मोठी गती


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ अभियानाला मोठी गती

Ø आयजीजीएमसी नागपूर-डब्ल्यूसीएलमध्ये ५ कोटींचा सामंजस्य करार

Ø  मार्च २०२७ पर्यंत विदर्भात २५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार

मुंबई/नागपूर, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वांकांक्षी ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्यात ५ कोटींचा सामंजस्य करार यासाठी करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाची विदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, मार्च २०२७ पर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये २५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत सर्व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिकांना दर्जेदार व मोफत नेत्रोपचार उपलब्ध होणार असून, त्यांच्या दृष्टीचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाठबळामुळेच आयजीजीएमसी, नागपूरला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमुळे संपूर्ण विदर्भात व्यापक स्तरावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबविणे शक्य होणार असून, ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या उपक्रमामुळे केवळ मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्याचे प्रमाण कमी होणार नाही, तर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार नेत्रोपचार सहज उपलब्ध होतील. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात शासन, वैद्यकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाद्वारे विदर्भातील हजारो नागरिकांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

००००००

Friday, 31 July 2026

सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा - गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 



सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा - गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Ø जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्हीप्रकारे उपयोग करता येतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सायबर गुन्हे वाढत असून सामान्य नागरिकांचे हक्काचे पैसे परस्पर वळविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. सोबतच अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री आणि सेवन ही सुध्दा अतिशय गंभीर बाब आहे. या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिस यंत्रणेने विशेष लक्ष देऊन सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ संबंधित गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पोलिस अधिक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त्‍ पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

सायबर फसवणुकीचे तसेच अंमली पदार्थसंबंधित गुन्हे, हे अतिशय गंभीर विषय आहेत, असे सांगून गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसांच्या हक्काचे पैसे परस्पर दुस-या खात्यात वळविले जातात. त्यामुळे पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच त्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो. या पैशाची परतफेड करणे एक आव्हान असते. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत समाजात जास्तीत जास्त जनजागृती करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री व सेवन होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. आपापल्या पोलिस स्टेशनच्या क्षेत्रात असे गुन्हे घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

चंद्रपूर हा औद्योगिक आणि राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गोवंश तस्करी / हत्या रोखण्यासाठी सीमेवरील नाक्यांवर कडक तपासणी करावी. आवश्यक असल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियेाजन करावे. नाक्यावरील पथकांद्वारे योग्य कारवाई होते की नाही, हे तपासण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी तेथे अकस्मिकपणे भेटी द्याव्यात. गावागावातील पोलिस पाटलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना, त्यांच्या जबाबदा-या आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन करा, अशा सुचना गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी केल्या.

वेगवेगळ्या घटनेत नागरिकांचे हरविलेले 105 मोबाईल, गत एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढले आहेत. सदर मोबाईल गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले. यात अनिकेत दुमारकर, प्रेम किटे, मंगेश फटिंग आदींचा समावेश होता.

पोलिसांनी संवादी व्हावे : महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक अतिशय महत्वाचे आहे. या पथकाने बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात तसेच महिलांची गर्दी असलेल्या इतरही ठिकाणी गस्त वाढवावी. जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल. तसेच पोलिस यंत्रणेने आपले गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. नागरिकांशी नियमितपणे संवाद साधला तर ब-याच गोष्टींची माहिती पोलिसांना प्राप्त होते. वरिष्ठ पोलिस अधिका-यांसोबत इतर पोलिसांचा आणि कर्मचा-यांचासुध्दा चांगला संवाद असणे गरजेचे आहे, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. 

पोलिस अधिक्षकांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी सादरीकरणातून उपलब्ध मनुष्यबळ, जिल्ह्यातील क्राईम रेट, दाखल गुन्ह्यांची माहिती, अपघात व त्यात होणा-या मृत्युची संख्या कमी करण्यात पोलिसांना आलेले यश, अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, मोक्काची प्रकरणे, गोवंश प्रकरणे, तडीपारची प्रकरणे, सायबर गुन्हे, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य प्रमाणपत्र वाटप, स्वसंरक्षणासाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण, वाहतूक नियम जनजागृती आदींबाबत माहिती दिली.

०००००००