‘सिध्दी 2017 संकल्प 2018’ अभियानात
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे प्रतिपादन
चंद्रपूर, दि.2 जानेवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्यावर्षभरात चंद्रपूर जिल्हयाने प्रशासनातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य नागरिकाला प्रशासनाच्या योजना, उपक्रमाचा लाभ मिळत असून दृष्टीक्षेपात येणारा बदल यावर्षभरात त्यांनी अनुभवला. हॅलो चांदा, संगणक प्रशिक्षण, ट्रकींग डॅशबोर्ड, कुक्कुटपालन क्लस्टर, 99 टक्क्यांवरील शौचालय निर्मिती, विविध आवास योजनेतून घरांची निर्मिती आणि शेतक-यांना महाकर्जमाफीतून मिळालेला दिलासा प्रमुख उपलब्धी ठरल्या आहेत. याशिवाय दारुबंदीची अंमलबजावणी आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा ही गेल्यावर्षीची सिध्दी असून येणा-या वर्षात महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हयाचा संकल्प आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित “ सिध्दी 2017, संकल्प 2018 ” या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत आशुतोष सलिल यांनी गेल्यावर्षभरातील उपलब्धी व 2018 मधील संकल्पाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातील या वरिष्ठ अधिका-यांनी यावेळी गेल्यावर्षभरात राज्य शासनांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कॉपीटेबल बुक व जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या तीन वर्षातील उपलब्धीची घडीपुस्तिका संदर्भासाठी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी प्रशासनाने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे आणि जिल्हयाने विविध योजनांमध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याचे सादरीकरण केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यामध्ये ट्रकींग डॅशबोर्ड ग्रामविकास योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गाव पातळीवरील प्रत्येक घटकाची नोंद घेतली जाते. त्यामुळे कोणती योजना कोणत्या गावामध्ये राबविणे आवश्यक आहे. त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा यंत्रणेकडे येत आहे. त्यामुळे दूर्गम भागातील सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबतचा रोडमॅप आखण्यामध्ये सुविधा होत असून जिल्हयाच्या नियोजनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. हॅलो चांदा या यशस्वी योजनेच्या कार्य पध्दतीची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर एक हजार आदिवासींच्या जिवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात करणा-या पोंभूर्णा तालुक्यातील कुक्कुटपालन क्लस्टरची यशकथा त्यांनी पत्रकारांना सांगितली. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध बदल व अभिनव संकल्पनांचा झालेला लाभ त्यांनी पत्रकारांपुढे मांडला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर यांनी गेल्या वर्षभरात पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला. चंद्रपूर जिल्हयामध्ये खुनासारख्या मोठया गुन्हयातील सर्व प्रकरणांचा तडा लावण्यात पोलीसांना यश आल्याने या घटकातील शंभर टक्के उपलब्धीचा आढावा त्यांनी मांडला. जिल्हयामध्ये दारुबंदी केल्यानंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त करण्यात वर्षभरात यश आल्याचे त्यांनी सांगितले. 9 हजार 560 आरोपींना या प्रकरणात खटला दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हयामध्ये पोलीसांसाठी मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हयामध्ये स्वच्छ भारत मिशनचे लक्ष 99 टक्क्यांवर पूर्ण झाले असून लवकरच जिल्हा स्वच्छतेमध्ये 100 टक्के यशस्वी झाल्याचे नजीकच्या काळात जाहिर करण्यात येईल, असे सुतोवाच केले. जिल्हयाची मॉडल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून भारतातून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील 1540 शाळा डिजीटल झाल्या असून पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानामुळे संगणकीय क्षेत्रातील ज्ञानामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत असल्याचे त्यांनी सांगितले. 2 शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये क्रांतीकारी ठरलेली अमृत पाणी पुरवठा योजना व स्वच्छता ॲपची उपलब्धी यावेळी मांडली. जिल्हयामध्ये यावर्षी पाणी उपलब्धता कमी असतांना देखील शहर वाशियांना मुबलक पाणी मिळेल असे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा सुरु झाल्यानंतरच एक दिवस आड पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत विचार केल्या जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरवितांना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बाबुपेठ उड्डान पुलासारखा प्रश्न लवकरच निकाली लागणार असून शहरातील प्रमुख चौकांच्या सौंदर्यीकरणातून चंद्रपूरचे रुप पालटणार असल्याचे सांगितले.
2017 मधील जिल्हा प्रशासनातील महत्वाचे निर्णय
· ‘हॅलो चांदा’, पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेची यशस्वी सुरूवात
· 1800-266-4401 या क्रमांकावर तक्रारीचा ओघ वाढला, प्रशासनाची गती वाढली
· टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यातील ट्रकींग डॅशबोर्ड ग्राम विकास योजनेला सुरूवात
· नेमक्या कोणत्या योजना कुठे, किती प्रमाणात आवश्यक आहे याची माहिती मिळायला सुरूवात
· तीन तालुक्यातील प्रयोगाला लवकरच जिल्हाव्यापी करण्यासाठी सुरूवात करणार
· जिल्हयात पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानाला सुरूवात
· डिजीटल शाळांतील मुलांना/ शिक्षकांना टाटा ट्रस्टच्या मदतीने डिजीटल साक्षरता अभियान
· 38,600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून 942 शाळांमध्ये संगणक असणारी बस भेट देणार आहे.
· जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना महाकर्जमाफी
· जिल्हयामध्ये पोंभुर्णा तालुक्यात ‘कुक्कुटपालन क्लस्टर’ तयार करण्यात आले आहे.
· 1 हजार आदिवासी कुटुंबांना पुढील 3 वर्षांसाठी या अभियानामध्ये सहभागी करण्यात आले आहे.
· आर्थिक सुबत्तेची हमी असून या माध्यमातून नियमित अर्थाजनाची घडी बसवली जाणार आहे.
· पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्सुअल ओफेन्स ॲक्ट) या मुलांवरील लैगिक अत्याचार प्रतिबंद आयदयाची अंमलबजावणी करणारा पहिला जिल्हा.
· महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांच्या सहभागातून जिल्हयात सेतू केंद्राला सुरूवात; महिला सबळीकरणाला चालणा.
· जिल्हयातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे पर्यटनाला चालणा देणारे सुशोभीकरण
· जिल्हयामध्ये गरजू, होतकरू व अभ्यासू मुलांसाठी अभ्यासाठी व्यवस्था निर्माण करणाऱ्या अभ्यासिकांचे जाळे सुरू
· प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रेक्षागृहाचे नूतनीकरण आणि या ठिकाणी प्राचीन नाणी संग्रालयाची सुरूवात.
जिल्हा परिषदेमार्फत वर्षभरातील उपलब्धी
· प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 1282 घरांचे काम पूर्ण. 47.33 कोटी रूपयांतून 7851 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
· रमाई आवास योजनेतुन 349 घरे पूर्ण. 10.01 कोटी रूपयातून 1252 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
· शबरी आवास योजनेतून 191 घरे पूर्ण. 5 कोटी 63 लक्ष रूपयातून 788 घरांचे उद्दिष्टय.
· स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 99.94 टक्के वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टय पूर्ण.
· 99.64 टक्के गावे उघडयावरील शौच मुक्त झाली आहेत.
· 5 पैकी 14 तालुके उघडयावर शौच मुक्त करण्यात आली आहे.
· जिल्हयात 53 कोटी 31 लक्ष रूपयाचा निधी सिंचन विहिरीसाठी मिळाला असून यातून 3 हजार 614 विहिरींचे निर्माण करण्यात येणार आहे.
· जलयुक्त शिवार योजनेतून 136 कामे करण्यात येणार असून याव्दारे 1525 हेक्टर संक्षीत सिंचन क्षमता निर्मितीची हमी
· मामा तलावासाठी 414 कामे मंजूर असून याव्दारे 7 हजार 780 हेक्टर सिंचन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न आहेत.
· राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत 12 नळ योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
· जिल्हयात 35 ठिकाणी आरओचे शुध्द पाणी पोहचवण्याचे उदिष्ठय असून 9 ठिकाणी पूर्ण क्षमतेने योजना सुरू झाली आहे.
· जिल्हयामध्ये 2017-18 साठी जिल्हा प्ररिषदमार्फत 70 कीमी रस्ता निर्मिती केली जाणार आहे.
· मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 280 की.मी.काम मंजूर आहेत.
· जिल्हयात 1540 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत.
· जिल्हयामध्ये सध्या 2684 अंगणवाडी कार्यरत आहेत.
· राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत सर्वत निर्देशांकात चंद्रपूर जिल्हयाला प्रथम पुरस्कार.
· भारतातून मॉडेल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हयाची निवड.
पोलीस प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी
· जिल्हयातील दारुबंदीनंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त
· 24 कोटी रुपयांची दारु जप्त
· अवैध दारुची विक्री व वहन करणा-यांवर 9 हजार 50 खटले दाखल
· खुनासारख्या गंभीर गुन्हयांचे 100 टक्के तटा
· नकली ऐटीएम तयार करणा-या आंतरराज्यीय गॅगचा पडदाफाश
· सायबर क्राईम सेलकडून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयांचा तपास
· पोलीसांसाठी घरे व नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला गती
महानगरपालिका प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी
· केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत 231 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कार्याला सुरुवात.
· शहरात 8 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरु
· अमृत योजनेअंतर्गत मलप्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी महाजनकोला देण्याबाबत प्रकल्प करणार.
· रामाळा तलावाच्या विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात
· झरपट नदी विकास कार्यक्रमातंर्गत अंचलेश्वर गेटजवळील सौंदर्यीकरणाला सुरुवात.
· शहरातील खुल्या जागांचा विकास करणार
· बाबुपेठ स्टेडीयमचे बांधकाम, कोनेरी स्टेडीयमचे नुतनीकरण करणार.
· ऊर्जाबचतीसाठी नवे पथदिवे उभारण्याचे काम सुरु
· नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कामाला सुरुवात.
No comments:
Post a Comment