चंद्रपूरात अत्याधुनिक पोलिस व्यायाम शाळेचे लोकार्पण
चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणा-यांना वठणीवर आण्ण्याचे काम पोलिस कर्मचारी करतात. पोलिस कल्याणशी संबंधित नस्ती कधी आली व ती निगेटीव्ह असली तर ती मी पॉझीटीव्ह करतो. सायबर क्राईम लॅब प्रथमतः चंद्रपूरात सुरू झाली. 2015 मध्ये ही सुरूवात करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा ठरला. त्यानंतर इतर जिल्हयांमध्ये सायबर क्राईम लॅब सुरू झाल्या. पोलिस भरतीमध्ये जिल्हयाचे प्रमाण अधिक वाढावे यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र,पोलिसांसाठी निवासस्थाने आम्ही तयार करीत आहोत. निवृत्त पोलिस कर्मचा-यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलिस कल्याणासाठी शासन पोलिसांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूरात पोलिस जीम च्या लोकार्पण सोहळयात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ.नानाजी शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर सौ.अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, पोलिस अधिक्षक नियती ठाकर,अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोलिस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही जिल्हयात 102 कोटी रूपये खर्च करून पोलिसांसाठी क्वॉर्टरचे बांधकाम केले. बल्लारपूर येथे 10 कोटी रू. निधी खर्चून नव्या पोलिस स्टेशनचे बांधकाम, दुर्गापूर येथे नविन पोलिस स्टेशनचे बांधकाम आपण करीत आहोत. राज्यात काहीच ठिकाणी असणारी अशी सीसीटिव्ही मोबाईल व्हॅन चंद्रपूरात आपण घेतली. पोलीसांना सुविधा देण्याबाबत हात आखडता घेणार नाही. जिल्हा दारुबंदी करतांना जिल्हयाच्या सदृढ आरोग्याचाच आम्ही विचार केला होता. पोलिसांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला असून जिल्हा व्यसनमुक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये योगदान देण्याचे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
1.36 कोटी रू. खर्चून बांधण्यात आलेल्या या पोलिस जीम चे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी केले. या पोलिस जीमच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याला आकार देण्याचे काम होणार असल्याचे त्या म्हणाल्या. पुण्यामध्ये असणा-या व्यायामाच्या मशीन्स याठिकाणी आहेत. सरकारी यंत्रणेतील ही पहिली अदयावत यंत्रणा आहे. यातील काही आधुनिक यंत्रे चेन्नईहुन मागविण्यात आली आहेत. पोलिसांच्या आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने ही व्यायामशाळा अतिशय महत्वाची ठरणार असल्याचे नियती ठाकर म्हणाल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक हेमराज राजपुत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हयातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment