Search This Blog

Monday, 15 January 2018

चंद्रपूरमधून महाराष्ट्रभर जाऊ दया जलसाक्षरतेचा संदेश - ना. सुधीर मुनगंटीवार



·        महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन
·        कृषी प्रदर्शनी, बचत गटांच्या विक्री प्रदर्शनीला सुरूवात
·        15 ते 19 जानेवारी चांदा क्लबवर भेट देण्याचे आवाहन

         चंद्रपूर, दि.15 जानेवारी-  भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे केवळ निबंधात लिहायचे वाक्य न राहता आता शेती ही आमच्या जीवनमानाचा, प्रगतीचा, अर्थार्जनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. त्यासाठीच राज्य शासन जल, जमीन, जंगल या जीवनचक्राला बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असून जलसाक्षरता ही या श्रृखंलेतील महत्वाची कडी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे आज उद्याटन झाले आहे. चंद्रपूर मधून जलसाक्षरतेचा हा संदेश महाराष्ट्रभर जाऊ दया, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
               चंद्रपूर येथील चांदा क्लबवर आजपासून कृषी महोत्सव,  बचत गटांच्या विक्रीचा व प्रदर्शनीचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमाच्या उद्घाटनात विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभही करण्यात आला. 15 ते 19 जानेवारी या काळात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जल, जमीन, जंगल यांच्या बळकटीकरणाला उभारी देणारे विविध मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, प्रदर्शनी व विक्री अनुभवायला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जलसंपदा विभागाअंतर्गत विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्यावतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन भव्य मार्गदर्शन हॉल, योजना व माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, बिगर सेंद्रीय शेती, यांचे दालन, शेतमाल विक्री माहिला बचत गटांचे विक्री प्रदर्शनी, पशुसंवर्धन विकासांची प्रदर्शनीचे एकूण चार वेगवेगळे दालन अशी चांदा क्लबला व्यापणारी भव्यता यामध्ये आहे. याच व्यासपीठावर विदर्भातील वैनगंगा, वर्धा, वेणा, प्राणहीता, कन्हान, बाघ आणि इरई नदीतील सात कुंभाचे पाणी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांना अर्पण करण्यात आले. त्यांनी हा जलकुंभ वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधीनीत आजपासून सुरू करण्यात आलेल्या विभागीय जलसाक्षरता केंद्राला अर्पण केला. यासोबतच महाराष्ट्रातील पहिला जलसाक्षत्ता केंद्राचे उद्घाटन झाले.
               या कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह देशाचे गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, रमन मैगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरूष, राजेंद्र सिंह, आमदार नानाजी शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, यशदा पुणेचे उपमहासंचालक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वन व्यवस्थापन विकास प्रबोधिनी संचालक अशोक खडसे, मुख्य अभियंता ब.श स्वामी, अधिक्षक अभियंता के.सु. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, रविंद्र शिवदास, उपमहापौर अनिल फुलझले, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, यांच्यासह जलसंपदा, कृषी, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जलसाक्षरता केंद्र, यशदा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेती या विषयावर सरकार अतिशय गंभीर असल्याचे प्रतिपादन केले. राज्यशासनाने 2017-18 चा अर्थसंकल्पात 63 हजार कोटीची तरतूद केली. शेतीचा थेट संबंध हा पाण्याशी आहे. त्यामुळे देशाचे विख्यात जलतज्ञ ,जलपुरूष राजेंद्र सिंग यांनी जलसाक्षरता हा विषय मांडल्यावर त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून त्याची सुरूवात आज त्यांच्या उपस्थितीत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन यामध्ये पाण्याच्या साठयाची आवश्यकता सर्वाधिक असून जलसाक्षरता अभियानातील हजारो स्वयंसेवकामार्फत पाण्याचे महत्व गावोगावी कळणार आहे. चंद्रपूर मधून त्याची सुरवात होत असल्याचा मला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी वाचनालयाचा प्रायोगिक प्रकल्प 21 गावांमध्ये सुरू केला आहे. 125 पुस्तके याठिकाणी देण्यात आली आहे. शेतीबद्दल आत्मियता वाढावी हा यामागील उद्देश आहे.उथलपेठमध्ये मशरुमचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष ठेवून आहोत. जिल्हात पंजाब नॅशनल बँकेच्या मदतीने समुद्रपूर येथे शेती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुरू आहे. चंद्रपूर मध्ये सुरू करण्यात आलेले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून यामाध्यमातून शेकडो कुटुंबाना रोजगार मिळत असून त्यामध्ये वृद्धी करण्याचा आमचा संकल्प आहे. लवकरच या विभागात कृषीवर आधारीत राष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास केंद्राचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हात मदर डेअरीचा प्रकल्प सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र हे सर्व करतांना यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
               देशाचे गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत गंभीरतेने लक्ष देणे सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील त्यातही विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग भरून निघावा यासाठी  विदर्भातील सिंचन प्रकल्पाला गती दिली आहे. त्यांचा संदेश घेवून जिल्हयात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मोठया उमेदीने अनेक प्रकल्प राबवित असून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे हे सरकार आहे. केवळ दान अनुदान, कर्जमाफी या लोकप्रिय घोषणांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वृक्ष लागवड, जलसंधारण, जलयुक्त शिवार, जलसाक्षरता, शेतीचा बाजार, शेतमाल विक्री, आयात निर्यात धोरणात बदल आणि वातावरणातील बदल याबाबत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अवगत केल्या जात आहे. प्रत्येक गावातील नाला खोलीकरण हे अभियाण झाले पाहीजे. प्रत्येक गावाचे सिंचनाचे धोरण ठरले पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी आपल्या गावातील पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाणी साठे वाढविले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील आता स्वताहून पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.      
               जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार सारखी योजना महाराष्ट्राने यशस्वी केली आहे. या अभियानाला आजच्या जलसाक्षरता अभियानाने बळकटी येणार असून सुधीर मुनगंटीवार हे कृषी क्षेत्रासाठी  अतिशय सकारात्मक असणारे मंत्री असल्याचे प्रतिपादन केले. राज्यात जलयुक्त शिवारने जमिनिखालील पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मिटर पाण्याची पातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाले असून कृषी जलसंधारण या साठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे जागरूक अर्थ मंत्री असल्याने नविन प्रकल्प यशस्वी होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्ज माफी देतांना मुनगंटीवार यांनी जलयुक्त शिवार योजनेला कोणतीही कपात सुचवली नाही. ‘जल है तो कल है’ याची जाणीव ठेवणारा वन मंत्री महाराष्ट्राकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी आपल्या घराघरातील वर्षाच्या, महिन्याच्या आर्थिक बजेट प्रमाणे पाण्याचे देखील नियोजन करा, असे आवाहन केले.
               जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंग यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस पाण्याचा बदल लक्षात घेवून पिकाचे नियोजन करा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. भारतातील पहिले जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर येथे सुरू होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. देशभरातील अन्य नेत्यांप्रमाणे ते देखील चर्चा करतील व विसरून जातील असे वाटत होते. मात्र त्यांनी दोन वर्षात या विषयाचा पाठपुरावा केला, अर्थ संकल्पात तरतुद केली. यशदा, वनविभाग व महसूल विभाग यांना या मध्ये सहभागी केले. हे अभियान सुरू करण्यासाठी  स्वत: संपर्कात  राहून प्रत्यक्ष यंत्रणा उभी केली. गावागावात स्वयं सेवेत काम करणारे जलदूत उभे केलेत. आता ग्रामसभांना आपल्या गावाचे जल आराखडा तयार करण्याचे आपल्या मार्फत सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.
               या कार्यक्रमामध्ये जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या आयोजनाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या शुभारंभाचे प्रास्तावीक विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालन अविनाश सुर्वे, कृषि महोत्सवाचे प्रास्ताविक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती विद्या मानकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन सुमन पांडे यांनी केले. 19 जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शनी चालणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment