पोभूर्णा येथे इको पार्क, आरो मशीन चे लोकार्पण व तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भुमीपूजन
चंद्रपूर, दि.25 जानेवारी - शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार बल्लारपूर मतदार संघातील नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी विविध विकास कामे मोठया प्रमाणात करीत आहोत. तसेच या परिसरातील युवकांना मोठया प्रमाणात सैन्य भरती, पोलीस भरती यासाठी आवश्यक असणारे शारिरीक प्रशिक्षण मिळावे, तसेच बल्लारपूर मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर मतदार संघातील पोंभूर्णा येथे विविध विकासकामांचे उदघाटन, लोकार्पण, शुभारंभ कार्यक्रमासाठी ते आज पोंभूर्णा नगरात दाखल झाले होते. आज त्यांनी प्रथम पाटबंधारे विभागाच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमीपुजन केले. त्यानंतर पोंभूर्णा नगर पंचायत येथे शुध्द पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीनचे लोकार्पण व डस्टबीन वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोंभूर्णा येथे तयार करण्यात आलेल्या इको पार्कचे लोकार्पण त्यांनी केले.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार ॲड.संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, पोंभूर्णा नगर पंचायतचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योतीताई बुरांडे, गंगाधर मडावी, पोंभूर्णा नगर पंचायत सभापती पुष्पाताई बुरांडे, नेहाताई बघेल, किशोर कावळे, गटनेता अतिक कुरेशी, नगर सेवक विजय कस्तूरे, मोहन चलाख, श्वेताताई वनकर, सुनिता मॅकनवार, रजियाताई कुरेशी,शारदा कोडापे, अमरसिंह बघेल, कल्पनाताई गुरनुले, सविता गेडाम, जयपाल गेडाम, माधुरी चांदेकर,मुख्याधिकारी विपीन मुध्दा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने,प्रमोद कडू आदी उपस्थित होते.
यावेळी आरो मशीनचे लोकार्पण करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पिण्या चे पाणी या संदर्भात सर्व योजना राबविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगितले. पोंभूर्णा नगर पंचायतीच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात केलेल्या विविध कामाचा आढावा त्यांनी घेतला. या मतदार संघाने मला मतरूपी आशिर्वाद दिल्यामुळे पाचव्यांदा मी विधानसभेत गेलो. तुमच्या आशीर्दाने मंत्री झालो. तुमच्यामुळे मला महाराष्ट्रभर सन्मान मिळत आहे. याची जाणीव ठेवून या मतदार संघातील प्रत्येक शहर व गावातील विकासासाठी मी प्रयत्न करीत आहे. पोंभूर्णा ही सुंदर नगर पंचायत म्हणून महाराष्ट्रात या शहराचे नाव व्हावे, अशी माझी इच्छा आहे. या मतदार संघातील तरुणांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी मोठया प्रमाणात आपण अभ्यासिका निर्माण करतो आहे. या ठिकाणचे तरुण वेगवेगळया ठिकाणी महत्वाच्या पदावर जावेत अशी आपली इच्छा आहे. या भागातील उमेदवारांनी सैन्य दल, पोलीस दल व अन्य विभागात भरती व्हावे, यासाठी लवकरच आपण पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुरुवात या मतदार संघात करीत आहोत. प्रत्येक सैन्य भरतीत व पोलीस भरतीत या भागातील तरुणांची निवड व्हावी यामागची आपली भूमिका असून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रशिक्षण संस्था उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर येथे सैनिकी शाळेसोबत बल्लारपूर मतदार संघातील पोलीस प्रशिक्षण केंद्र या भागातील तरुणांसाठी महत्वाचे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment