Search This Blog

Tuesday 9 March 2021

महिलांच्या कर्तबगारीला संधी द्यावी - जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले

 

महिलांच्या कर्तबगारीला संधी द्यावी

-  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले

 

चंद्रपूर, दि. 9 मार्च :   महिलांना ज्या-ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या-त्या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे पुरुषदेखील मान्य करतात, परंपरा, धर्म, रूढी आणि पुरुषप्रधान संस्कृती झुगारून समाजाने महिलांच्या कर्तबगारीला संधी द्यावी व आपला दृष्टीकोन सुधारावा, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी काल व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ काल जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ. संध्या गुरनुले बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखा कारेकर, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शंकर किरवे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी  महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानामध्ये बचत गटाच्या माध्यमातून पॅकेजिंग व ब्रँडिंग, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार, घरकुल योजना, शाश्वत शेती, मनरेगा विकास या विषयांवर मान्यवरांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

काय्रक्रमाला उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रीती खारतूडे, जिल्हा अभियान व्यवस्थापन अधिकारी गजानन ताजने व जिल्हा परिषेदेच्या महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment