Search This Blog

Friday 16 July 2021

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील  शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप

चंद्रपूर दि.16 जुलै  : कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापनाकरीता विविध कृषी निविष्ठांचे वाटप जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. जिवती येथील माणिकगड शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सदर कृषी निविष्ठा वाटप करण्यात आल्या.

शेतातील उत्पादन खर्चाचा प्रमुख भाग म्हणजे बियाणे, खते व कीटकनाशके हे आहेत. त्यांचे योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो व शाश्वत किफायतदार शेतीचे ध्येय साध्य करता येते. परंतु सध्याच्या काळात रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत खराब होत चालली आहे. जर जमिनीचे आरोग्य राखायचे असेल व उत्पादन खर्चात बचत करायची असेल तर रासायनिक खते व कीटकनाशके याबरोबरच जैविक खते व कीटकनाशके यांचा एकात्मिक वापर करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने  कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने जिल्हा खनिज प्रतिष्ठान सन 2021-22 अंतर्गत तालुक्यातील आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खते, कीटकनाशके यांचे किट वाटप करण्यात येत आहे . सदर किटमध्ये लिक्विड कन्सोरशिया, मायकोरायझा ग्रॅन्यूअल्स, झिंक सल्फेट, बोरॉन 20 टक्के, द्रव्य रूप मायक्रो न्यूट्रीअन्ट, निंबोळी अर्क/नीम पॉवर 3000, व्हर्टिसिलिअम, फेरोमन सापळे, पेक्टिनोफलोरा लुअर्स या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार जिवती तालुक्यातील कंपनी व शेतकरी गटातील एकूण 400 शेतकऱ्यांना या किटचे वाटप करण्यात आले.  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते देविदास तुकाराम गायकवाड, बाळू वामन चव्हाण, चंद्रकांत रतन राठोड, नामदेव धोंडीबा कदम, उत्तम रामा चव्‍हाण, अविनाश भगवान चव्हाण या शेतकऱ्यांना सदर किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.डी.मोरे, उपविभागीय अधिकारी (महसूल) संपत खलाटे,  जिवतीचे तहसीलदार अमित बनसोडे,  तालुका कृषी अधिकारी पी. एस. गोडबोले, कृषी पर्यवेक्षक पी. एन. ढाकणे, कृषी सहाय्यक श्री.डाखोरे, श्री. उदगिरे तसेच माणिकगड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष गुणवंत कांबळे व सचिव प्रेमानंद पंडित हे प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment