मन झोकून काम करण्याचे अधिका-यांना आवाहन
चंदंद्रपूर, दि.10 फेब्रुवारी- केंद्र व राज्यातील सहभागी असणा-या सर्व सत्ताधा-यांना विदर्भामध्ये शेतक-याच्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारीत उद्योग वाढावे, असे वाटते. त्यामुळेच मदरडेअरी सारखी यंत्रणा चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून दुग्ध उत्पादनात क्रांती करण्याची ही एकमेव संधी समजून झोकून देत अधिका-यांनी काम करावे, असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले. शासकीय विश्रामगृहामध्ये आज आयोजित मदर डेअरीचे अधिकारी, दुध संकलन केंद्र संचालक यांच्या बैठकीत त्यांनी जिल्हयात सुरु असलेल्या मदर डेअरीच्या उपक्रमाचा आढावा घेतला. सद्या 15 हजार लिटर दुध संकलनाचे काम जिल्हयात सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी मदर डेअरी व दुध उत्पादक संकलन केंद्राच्या संचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. खाजगीरित्या गायी खरेदी करण्यासाठी अनेक कुटूंबांना प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यासाठी इन्सुरन्स कंपनीनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तम प्रतीच्या दुधाळू जनावरांची उपलब्धता जिल्हयात होईल, यासाठी पशुसंवर्धन विभागाने लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हयामध्ये दुधाळू जनावरांच्या संदर्भातील शासकीय योजना लोकापर्यंत पोहचतील पशुधन मोठया प्रमाणात विविध शासकीय योजनेमधून उपलब्ध होईल. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. दुधात फॅट कमी असण्याबाबत यावेळी चर्चा उपस्थित झाली. यावेळी अहीर यांनी पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपलब्ध पशुधनाच्या आरोग्य व दुध वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच उत्तम दर्जाचा चारा उत्पादनाबाबत शेतक-यांना गती दयायला सांगण्याचे स्पष्ट केले.
जिल्हयामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छूक असणा-या शेतकरी कुटूंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिका-यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्हयामध्ये सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या विक्रमाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. त्या ठिकाणी प्राधान्याने त्यांना कर्ज उपलब्ध करुन दयावे. दुध उत्पादनातील बँकांच्या कर्जाला निश्चितच परतफेड मोठया प्रमाणात मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी मदर डेअरीमुळे दुध उत्पादनात वाढ झाल्याबद्दल कौतुकही केले.
यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक झा, नाबार्डचे टाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे, विजय राऊत, राजू घरोटे, पाटील उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment