Search This Blog

Saturday 10 February 2018

ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ करणार- ना.मुनगंटीवार





आगरझरी येथील देखण्या बटरफ्लाय वर्ल्डचे लोकार्पण

       चंद्रपूर, दि.10 फेब्रुवारी- मुबलक पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबातून परत जाणा-या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे निश्चितच शिकवेल. त्यामुळे येणा-या काळात ताडोबा हे आपल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डचे त्यांनी आज लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळयानंतर फुलपाखरांमध्ये रमलेल्या जंगला शेजारील शाळांमधील विद्यार्थ्यांना व पर्यावरण प्रेमींना संबोधित करतांना त्यांनी ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धते सोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येईल, असे सूतोवाच केले. पुढच्या दोन वर्षात ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  आज आगरझरीच्या बटरफ्लाय वर्ल्डचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पामुळे ज्या गावांना रोजगार मिळत आहे. त्या गावांच्या नागरिकासोबत संवाद साधला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार पराक्रमी वाघांमुळे मिळत आहे. यामध्ये उत्तरोत्तर वाढच होईल. त्यासाठीच आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणा-या पर्यटकांना मोठया प्रमाणात पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असे स्पष्ट केले.
            फुलपाखरु प्रत्येकाच्या लहानातील आकर्षण असते आणि ते कधीच संपत नाही. अगदी 14 दिवसांचे जिवनक्रम असणारे फुलपाखरु देखील जगाला आनंदाने जगण्याचे संदेश देवून जाते. या ठिकाणी वन विभाग हजारो फुलपाखरांना जनतेसाठी उपलब्ध करणार आहे. हे फुलपाखरु उद्यान व त्याच्या शेजारी बनणारे माहिती केंद्र यापूर्वी उभारण्यात आलेले विद्यार्थ्यांसाठीचे प्रशिक्षण केंद्र येथे येणा-या पर्यटकाला निश्चितच आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  पर्यटनातून स्थानिकांना रोजगार देण्याचे काम करीत असून चंद्रपूर जिल्हयाची ओळख पर्यटनावर आधारीत रोजगार निर्मितीचा जिल्हा म्हणून व्हावी. हा आपला ध्यास असून त्यासाठीच ताडोबाच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.
          या कार्यक्रमाला पदमापूर, आगरझरी, अडेगांव, उडीयाटोला, मोहर्ली या शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने आले होते. या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसोबत बटरफ्लाय वर्ल्डची पाहणी केली. त्यांच्यासोबत फोटोही काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकाच्या भूमीकेत येत त्यांच्या अभ्यासाचीही चौकशी केली. नवीन फुलपाखरांचे उद्यान आवडल्याची पावती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. लहान मुलांना आवडेल अशा पध्दतीची मांडणी या ठिकाणी करण्यात आली असून  या फुलपाखरु पार्कमध्ये फुलपाखरांबद्दलच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार आहेतफुलपाखरांच्या जीवनपटाची शास्त्रीय माहितीचा खजीना उपलब्ध करण्यात आला आहे. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार, लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकतेपुल, मचान सवारी अशा अनेक पर्यटनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावक-यांकडून चालविल्या जाणार आहे. नागरिकांनी या नव्या प्रकल्पाला भेट दयावी, असे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे. आज झालेल्या लोकार्पण सोहळयाच्या व्यासपीठावर पालकमंत्र्यांसोबत वन‍ विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मनपा स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, डॉ.किशोर मानकर आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय वनअधिकारी श्री.शिंदे व त्यांच्या सहका-यांचा उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
                                                            0000 

No comments:

Post a Comment