ना.मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
चंद्रपूर दि 20 फेबुवारी : पतंजलीच्या विविध विक्री केंद्रातून चंद्रपूर जिल्हयातील दर्जेदार तांदुळ विकल्या जातील. तसेच पतंजलीला आवश्यक असणाऱ्या विविध वनौषधी शेतकऱ्यांनी शेतात घेतल्या तर या कंपनीमार्फत चंद्रपूर जिल्हा व परिसरातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन योगगुरू आणि पतंजलीच्या माध्यमातून कोट्यवधींचा उद्योग उभारणारे बाबा रामदेव महाराज यांनी आज येथे दिले.
बाबा रामदेव महाराज यांच्या सोबत जिल्हयातील शीर्ष अधिकाऱ्याशी मंगळवारी शेतकरी मेळाव्या पूर्वी चर्चा झाली. पुढील महिन्यात 2 मार्चला या संदर्भात पंतजलीच्या मुख्यालयात चर्चा होणार आहे. आपल्या पुढील 3 दिवसाच्या वास्तव्यात हे खाद्यान्न व वनौषधीची तपासणी देखील बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील चमू करणार आहे. या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठच्या मुदयावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या बैठकीला पालकमंत्र्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, उपवनसंक्षक गजेंद्र हिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा)डॉ.विद्या मानकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस.किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांची उपस्थिती. ही बैठक मूल येथील अजय गोगुलवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
बैठकीमध्ये अधिका-यांनी वनपरिसरात व शेतीमध्ये होणा-या पिकांची व वनऔषधीची माहिती या वेळेस दिली. चंद्रपूर जिल्हयामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय पध्दतीने धानाचे उत्पादन घेतात. सेंद्रीय तांदुळ विषमुक्त तांदुळ म्हणून प्रयोग शाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तांदळाची विक्री पतंजलीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी कृषी विभागाच्या अधिका-यांनी यावेळी केली. पतंजलीव्दारे किमान आधारभूत किंमत ठरविण्यात यावी. शेतक-यांना सेंद्रीय धानाचे उत्पादन घेण्याबाबत सांगण्यात येईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
यावेळी वनविभागाच्या अधिका-यांनी अर्जूनसाल, मोहाफूल, कोरफळ (अलवेरा), सेंद्रीय हळद, मोहा सरबत, मोहा जाम, सफेद मुसळी आदी वनऔषधी पासून तयार करण्यात आलेल्या उत्पन्नाबाबत माहिती दिली. यावेळी पूजेच्या सामानामध्ये अगरबत्तीसाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील बांबूला प्राधान्य देण्याचा प्रस्तावही वनविभागाच्या अधिका-यांनी ठेवला आहे. रामदेव महाराज यांनी यावेळी अधिका-यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले असून कोरफळ (अलवेरा) व मध याबाबतच्या कराराला तात्काळ मुर्तस्वरुप दिले जाईल, असे आश्वासन दिले. तथापि, पुढील दोन दिवसात रामदेव महाराज यांच्या सोबत आलेल्या तज्ज्ञाच्या चमू व स्वत: रामदेव महाराज सर्व वनौषधी व वनापासून बनविलेल्या खाद्यांची स्वत: तपासणी करणार आहेत. त्यांनी यावेळी मध खरेदीसाठी आपण आजच तयार असून याबाबतची यंत्रणा जिल्हयात उभी करण्याची सूचना वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या बैठकीमध्ये आलेल्या विविध प्रस्तावावर पुढील महिन्याच्या 2 ताखरेला पतजंलीच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार असून यामध्ये निर्णय घेतले जाणार आहे.
No comments:
Post a Comment