बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन संपन्न
दरवर्षी 1 हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची हमी
चंद्रपूर, दि.11 फेब्रुवारी- चंद्रपूर जिल्हयातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्याला 20 हजारावर रोजगार देण्याचा व तीन वर्षात 3 हजार तरूण त्या माध्यमातून प्रशिक्षीत करण्याचा आमचा मानस आहे. प्रतीवर्ष 1 हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील. या आधीही पोंभूर्णा आणि आगरझरी या ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प आम्ही सुरू केला आहे. तैवान सरकारच्या सहकार्याने टूथपीक निर्मीतीचा कारखाना तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या जिल्हयात तरूणांसाठी रोजगाराच्या मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध करून देत या जिल्हयाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 11 फेब्रुवारी रोजी बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन समारंभात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, तरूणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरूवात आम्ही या जिल्हयात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्दा केले आहे. चंद्रपूर जिल्हयात राजूरा येथे विमानतळ विकासासाठी 1200 एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुध्दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे श्री.मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापड निर्मीती करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे.
यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद व्दीवेदी, भय्याजी येरमे, सौ. रेणुका दुधे, एन.डी. जेम्स या संस्थेचे प्रमुख निलेश गुल्हाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भय्याजी येरमे यांनी केले. यावेळी आपल्या मनोगतात बोलताना निलेश गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले 15 वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची माझी तिव्र इच्छा होती. सूरत, मुंबईमध्ये हि-यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाही. रोजगारांची 100 टक्के हमी असून किमान 20 हजार रुपये रोजगार मिळू शकतो. सुधीरभाऊंनी या प्रक्रियेत मला दिलेल्या पाठींब्यामुळे व सहकार्यामुळे हे केंद्र उभे राहू शकले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत सदर केंद्राचे उद्घाटन आकाश लिडबे, स्वप्नील पेंढारकर, सचिन वासेकर, विक्की उडाणे या विद्यार्थ्यांचे हस्ते करण्यात आले. सदर डायमंड प्रशिक्षण केंद्र हे दादाभाई नौरोजी वार्डातील दादाभाई पॉटरीज येथे आहे.
यावेळी बोलताना बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, गेल्या तीन वर्षात 138 कोटीहून अधीक निधी बल्लारपूरच्या विकासासाठी सुधीरभाऊंनी खेचून आणला आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यावर त्यांनी प्रामुख्याने बळ दिले आहे. त्यांनी आणलेली प्रत्येक योजना महत्वपूर्ण असून रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने आपले महत्व अधोरेखित करणारी आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, रोजगार, शिक्षण या घटनकांवर लक्ष्य केंद्रीत करत सुधीरभाऊंनी या जिल्हयाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर केल्याचे ते म्हणाले. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक केले. सूरत, मुंबई येथे या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरी मिळणार आहे. तथापि, सुधीरभाऊंनी मनावर घेतले तर काही ही-याचे व्यापारी चंद्रपूर व बल्लारपूरमध्ये येऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाला बल्लारपूर श्हारातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन काशिनाथ सिंग यांनी केले तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.
डायमंड कटींग आणि प्रोसेसींग नेमके काय आहे ?
डायमंड कटींग आणि प्रोसेसींग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण 4 महिन्यात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान भोजन व निवास व्यवस्था निःशुल्क आहे. एन.डी. जेम्स ही कंपनी मुलांना हि-यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत तसेच मुंबई येथे रोजगार देण्याची हमी सुध्दा देणार आहे. पुढील तीन वर्षात 3 हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हमी देवून प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून उमेदवार पाठविण्यात येते. या प्रशिक्षणाच्या निवडीसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा कौशल्य विकास विभागांशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment