सेवा संकल्प अभियानांतर्गत मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी
Ø ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजन
चंद्रपूर, दि. 06 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूरच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, भिवकुंड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन, आवश्यक साहित्य व फळवाटप तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती व्हावी तसेच त्यांना सन्मानपूर्वक आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक आधार मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. गौरव दांडेकर, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. भारती गणवीर तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रमाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक मनोज सोदारी उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. गौरव दांडेकर व डॉ. भारती गणवीर यांनी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून योग्य आहार, नियमित औषधोपचार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि मानसिक आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ब्लँकेट, दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू आणि फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजना आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व अडचणींबाबत संबंधित शासकीय यंत्रणेकडून मदत व मार्गदर्शन घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षितता आणि कल्याणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने योगदान देणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विनोद मोहतुरे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००
#सेवा_संकल्प_अभियान
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment