सरी वरंबा पीक पध्दतीमुळे पीक उत्पादकतेत होणार वाढ
Ø कृषी विभागाची मुलस्थानी जलसंधारण मोहीम
चंद्रपूर, दि. 6 : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि एलनिनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने कृषी विभागामार्फत चंद्रपूर तालुक्यात मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा शेतकऱ्यांसोबत समन्वय साधून विविध जलसंधारण तंत्रांचा प्रभावी प्रसार करत आहे.
रुंद सरी-वरंबा पद्धत, सरी-वरंबा पद्धतीवर बेड लागवड, उताराला आडवी मशागत आणि उताराला आडवी पेरणी यांसारख्या तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतातच मुरते, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो आणि पिकांची जोखीम कमी होते. तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 18 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, भात, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे सरी-वरंबा पद्धतीचा स्वीकार वर्षानुवर्षे वाढत आहे. खरीप 2024 मध्ये 30 टक्के, 2025 मध्ये 34 टक्के आणि चालू सन 2026-27 मध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या 14 हजार 279 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 8 हजार 485 हेक्टर, म्हणजेच सुमारे 60 टक्के क्षेत्र सरी-वरंबा पद्धतीखाली आले आहे.
शेणगाव आणि बेलसणी परिसरातील शेतांमध्ये सरी-वरंबा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ड्रोन चित्रीकरणातून स्पष्टपणे दिसून येतो. या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य वापर, मृदासंवर्धन आणि अधिक उत्पादन यांचा सुंदर संगम साधला जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून जलसंधारण, मृदासंधारण आणि आधुनिक पीक व्यवस्थापनाचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरत आहे. ‘सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करा, पाणी आडवा पाणी जिरवा, उत्पादन वाढवा आणि शाश्वत शेतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा’ असे तालुका कृषि अधिकारी अनिकेत माने यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment