Search This Blog

Thursday, 2 July 2026

तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना


 तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना

चंद्रपूर, दि. 2 :  सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी छत्र या योजनेंतर्गत या उपयोजनेचा समावेश करण्यात आला असून ही योजना केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरून राबविण्यात येत आहे.

योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप : शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये इयत्ता 9 वी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थी भारताचा नागरीक असावा व त्यांच्याकडे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थाने https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून, ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासन पुरस्कृत इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यास सदर शिष्यवृत्ती देय राहणार नाही.

बीज भांडवल योजना : राज्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्ष वास्तव्य असलेल्या अप्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना 21 प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच त्या व्यतिरिक्त 12 प्रकारच्या व्यवसायांसाठी प्रशिक्षण देवून आवश्यक साधने संच (टूल किट) साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप : अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्ष रहिवासी असावा व त्यांच्याकडे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वयोगटातील व्यवसाय करण्यास सक्षम असावा. सदर योजनेंतर्गत लघु कर्ज योजना (25 हजार पर्यंत), मध्यम कर्ज योजना (50 हजार पर्यंत) व दीर्घ कर्ज योजना (2 लाख पर्यंत) यापैकी कोणतेही एक कर्ज अनुज्ञेय राहील. सदर योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा 5 टक्के असून, 45 टक्के शासन अनुदान व 50 टक्के राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्याने व्यवसायासाठीचा परवाना, व्यवसायासाठी लागणारी सामुग्री, यंत्र सामुग्री इत्यादी कोटेशन, बिले, जागेचा 7/12 किंवा जागा भाडयाची असल्यास भाडेकरारनामा, व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी सादर करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर यांचेकडे सादर करावे. सदर योजनेंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या लाभार्थ्यांस व्याजावर 3 टक्के रिबेट (सुट) देण्यात येईल. इच्छुक लाभार्थ्यांनी योजनांच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment