Search This Blog

Monday, 13 July 2026

दर्जेदार, सुलभ व नागरिकाभिमुख आरोग्य सेवा देण्यावर भर - आयुक्त संजय काटकर




 दर्जेदार, सुलभ व नागरिकाभिमुख आरोग्य सेवा देण्यावर भर - आयुक्त संजय काटकर

Ø ब्रह्मपुरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवेचा आढावा

चंद्रपूर, दि. 13 : सार्वजनिक आरोग्य विभागाचे (आरोग्य सेवा) आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक संजय काटकर यांनी ब्रह्मपुरी येथील प्रशासकीय भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य संस्थांची कार्यक्षमता, माता व बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, नियमित लसीकरण, आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी, आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रांची कार्यस्थिती, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

यावेळी आयुक्त श्री. संजय काटकर यांनी नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आरोग्य यंत्रणेची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवाभिमुख दृष्टिकोन स्वीकारून कार्य करावे तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियमित पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, रुग्ण समाधान, डिजिटल अहवाल प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, औषधांची उपलब्धता, उच्च जोखीम असलेल्या गर्भवती माता व बालकांचे नियमित निरीक्षण या विषयांवर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, जलजन्य तसेच इतर संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या कामकाजातील अडचणी जाणून घेण्यात आल्या. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यस्तरावर आवश्यक निर्णय व आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी ग्वाहीही आयुक्तांनी दिली. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या आढावा बैठकीस डॉ. शशिकांत शेंभेकर, उपसंचालक (आरोग्य सेवा), नागपूर, डॉ. गोगेवार, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर, डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, डॉ. भास्कर सोनकांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, डॉ. प्रीतम खंडाळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी, डॉ. मंदधरा सुखदेवे, तालुका आरोग्य अधिकारी, ब्रह्मपुरी, डॉ. पराग जीवतोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील तालुकास्तरीय कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

याशिवाय डॉ. ललित पटेल, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. संदीप गोडाम, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), डॉ. प्रकाश साठे, जिल्हा हिवताप अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे बैठकीत सहभाग नोंदविला.

बैठकीच्या शेवटी चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्यावर विशेष भर देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्यपूर्ण आढावा, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्तरदायित्व यांना प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

000000

No comments:

Post a Comment