Search This Blog

Friday, 17 July 2026

शैक्षणिक वर्ष 2021-22 ते 2025-26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा तातडीने निपटारा करा - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर


शैक्षणिक वर्ष 2021-22 ते 2025-26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा तातडीने निपटारा करा - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर

चंद्रपूर दि.17 : राज्य शासनामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा निपटारा करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित अर्जांवर शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार नसल्याने सर्व महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी केले आहे.

महाडीबीटी प्रणालीअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्जांना प्राधान्य देऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवावी. विद्यार्थी स्तरावर तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांवर कोणतीही दिरंगाई न करता कार्यवाही करून विहित मुदतीत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच इतर शिष्यवृत्ती योजना यापूर्वी www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवरून राबविण्यात येत होत्या. आता हे पोर्टल बंद करण्यात आले असून माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या www.mahadbt2.maharashtra.gov.in या नव्या पोर्टलद्वारे संबंधित योजना राबविण्यात येत आहेत. नव्या पोर्टलवर महाविद्यालयाची माहिती, विद्यमान प्राचार्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते, ई-मेल, पत्ता तसेच महाविद्यालयाच्या प्रोफाईलमधील सर्व माहिती अचूक व अधिकृत स्वरूपात भरणे अनिवार्य आहे.

विद्यार्थी स्तरावर प्रलंबित (Sent Back to Applicant) अर्जाबाबत, त्रुटीमुळे परत पाठविण्यात आलेल्या अर्जांच्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून दोन दिवसांच्या आत परिपूर्ण अर्ज प्राप्त करून घ्यावेत व त्यावर मंजुरीची कार्यवाही करावी. मुदतीत कार्यवाही न झाल्यास संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहू शकतात, याची स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना द्यावी.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित (Pending at Institute Level) अर्जाबाबत, प्रथम हप्ता (First Installment) व द्वितीय हप्ता (Second Installment) यासाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांची तातडीने तपासणी करून पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील मंजुरीसाठी पाठवावेत. शिष्यवृत्ती नियमानुसार अपात्र अर्ज Reject करावेत. कोणताही अर्ज महाविद्यालय लॉगिनवर प्रलंबित ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी दोन दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. परिणामी विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित विद्यार्थी व महाविद्यालय यांचीच जबाबदारी राहील, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment