Search This Blog

Friday, 17 July 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 17  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. 28 जुलै 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चंद्रपूर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारूडी, मांगगारोडी, मादगी आणि मादीगा या पोटजातींतील विद्यार्थी-विद्यार्थिनी पात्र राहतील. जिल्ह्यातील उपलब्ध निधीच्या अधीन राहून जेष्ठता व गुणवत्ता (मेरिट) यानुसार प्रथम 3 ते 5 पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच जिल्हा व्यवस्थापक यांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज ही सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन प्रतींसह सादर करावीत.

अर्ज व आवश्यक कागदपत्रे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील.

अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चंद्रपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 000000

No comments:

Post a Comment