खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू
Ø योजनेचा लाभ घेण्याचे डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 2 : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत 24 व्या राष्ट्रीय संचालन समितीद्वारा सन 2026-27 मध्ये खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना कृत्रिम रेतन सेवा पुरविण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत अवगत करण्यात यावे. कृत्रिम रेतन व लसीकरण यांच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर करण्याबाबत सुचित करावे, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना दिले आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश पशुधनाची गुणवत्ता सुधारणे आणि ग्रामीण भागात कृत्रिम रेतन व लसीकरण सेवांचा विस्तार करणे हा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी केलेल्या कामाची नोंद 'भारत पशुधन प्रणाली (एनडीएलएम) वर करणे अनिवार्य असून, त्यानुसार त्यांना खालीलप्रमाणे आकर्षक प्रोत्साहनपर अनुदान देय राहणार आहे.
महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकराकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023' अंतर्गत आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रशांत भड यांनी दिली आहे.
राज्यातील पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम रेतन व लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. संबंधित जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. त्यांनी केलेल्या सर्व कामांच्या नोंदी 'भारत पशुधन प्रणाली' वर अचूकपणे कराव्यात, जेणेकरून त्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ गतीने मिळू शकेल, जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी देखील आपल्या जिल्ह्यातील सर्व पात्र तंत्रज्ञांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवून त्यांना याबाबत अवगत व प्रोत्साहित करावे, असे डॉ. किरण पाटील आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी कळविले आहे.
०००००

No comments:
Post a Comment