एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारुप मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी पुन्हा एक संधी
Ø 17 ऑगस्ट ते 16 सप्टें. 2026 पर्यंत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध
चंद्रपूर, दि. 28 : राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम चालू असून सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी गृहभेटीस येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून द्यावयाचा आहे. गणना अर्ज भरून व त्यावर स्वाक्षरी करून दिलेल्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील.
ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील त्यांच्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.
या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा/विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती एका वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे व कलम 23 (3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, म.रा. यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment