Search This Blog

Wednesday, 29 July 2026

वेठबिगार कामगार कामावार ठेवल्यास करता येईल तक्रार


वेठबिगार कामगार कामावार ठेवल्यास करता येईल तक्रार

Ø  सहायक कामगार आयुक्त यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : वेठबिगारांना वेठबिगारीतून मुक्त करून त्यांचे पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने वेठबिगार पध्दत (निर्मुलन) अधिनियम-1976 लागू केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणा-या मालकाविरुध्द तक्रार करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

वेठबिगार कामगार म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध वेठबिगारी करणारा पुरुष/स्त्री अथवा बालकामगार अथवा वेठीस धरलेला व बिगारी कामे करणारा. सहसा अशा व्यक्तीने, स्वतः अथवा त्याच्या जवळचे नातेवाईकाने उधार अथवा अग्रीम म्हणून रक्कम अथवा वस्तू घेतलेली असते. ती रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने त्याला अथवा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला, त्या रकमेची परतफेड म्हणून, आवश्यक पूर्तता होईपर्यंत सांगितलेली कामे करावी लागतात.

वेठबिगार पध्दत (निर्मुलन) कायद्याचे उल्लंघन करणा-या मालकाला/व्यक्तीला तीन वर्षापर्यंतचा कारावास आणि 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच वेठबिगार कामगार पद्धती (निर्मूलन) अधिनियम 1976 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने 14 मे 2026 रोजी सुधारीत मानक कार्यपद्धती प्रकाशित केलेली असून त्याची अंमलबजावणी करण्याकरीता महसूल व कामगार विभागाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वरीलप्रमाणे वेठबिगार कामगार, कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्ह्यातील कामगारांनी/नागरिकांनी/समाजसेवी संस्थेने जिल्हाधिकारी, चंद्रपूर, स्थानिक पोलिस स्टेशन, जिल्ह्यातील उपविभागिय अधिकारी तसेच सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे प्रत्यक्षात, पोष्टाद्वारे  किंवा assttcommrchd@gmail.com ई-मेलद्वारे तक्रार करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र.भि. कावळे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment