Search This Blog

Sunday, 12 July 2026

विशेष लेख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

 विशेष लेख

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

योजना प्रक्रिया प्रवाह

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश खरीप हंगाम 2026 साठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र बनविणे हा आहे. या योजनेचे तीन घटक आहेत.

अ) कर्जमाफी : ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत एक किंवा अधिक अल्पमुदत पीक कर्ज घेतली आहेत किंवा या कालावधीतील पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन झाले आहे, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. परंतु ज्या शेतक-यांचे कर्ज /कर्ज हप्ते 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असणे व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झाले नाही, अशा शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांकडील 31 मार्च 2026 अखेरची थकबाकी 50 हजार किंवा कमी असल्यास त्यांना कमाल 50 हजारापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल.

ब) एकवेळ समझोता योजना (ओटीएस) : ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामधील कर्जाची/कर्जहप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी दोन लाखापेक्षा अधिक आहे व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झाली नाही, अशा शेतकऱ्यांनी प्रथम दोन लाखावरील रक्कम बँकेत भरणे आवश्यक आ.हे त्यानंतर त्यांना दोन लाख रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.

क) प्रोत्साहन लाभ : सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात पीककर्ज घेऊन त्याची किमान दोन वर्षे नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल. मात्र यासाठी 2025-26 व 2026-27 मधील पीक कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करणे आवश्यक राहील.

योजना प्रक्रिया प्रवाह : 1) या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ याबाबतची माहिती बँकेच्या व जिल्हास्तरीय यंत्रणेच्या सहकार्याने गाव, चावडी, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र व विकास संस्थेच्या नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. 2) लाभार्थी ओळखीसाठी आधार क्रमांक हा मुख्य निकष असेल. आधार क्रमांकाशी जोडणी नसलेल्या कर्ज खातेदारांची यादी बँकेच्या सुचना फलकावर प्रसिध्द करावी. ज्या शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांना बँकांनी याबाबत संक्षिप्त संदेश (एस.एम.एस) दयावा.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या चार स्वतंत्र याद्या : 1) कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी (सर्वसाधारण) 2) महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी (पुनर्लाभ) 3) एकवेळ समझोता योजनेनुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी (सर्वसाधारण) 4) एकवेळ समझोता योजनेत महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी (पुनर्लाभ).

सदर याद्या कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेसाठी बँक शाखानिहाय व गावनिहाय तयार केल्या जातील व यामध्ये विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, बँकेचे नाव, शाखेचे नाव, कर्ज खाते व एकूण थकीत रक्कम, कर्जमाफीची रक्कम (शासनाने द्यावयाची), शेतकऱ्यांनी भरावयाची एकवेळ समझोता याचा तपशील राहील.

गावनिहाय यादी गाव, चावडी येथे संबंधित तलाठी, ग्रामसेवक, विकास सेवा सचिव यांच्या मदतीने प्रसिध्द करतील. संबंधित बँकेमार्फत देखील यादी संबंधित बँक शाखेमध्ये प्रसिध्द करतील. संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या, आपले सरकार सेवा केंद्रात किंवा कोणत्याही बँक शाखेत जाऊन त्यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणीकरण करावे.

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा/नागरी सुविधा केंद्र येथे विशिष्ट क्रमांक व आधार कार्डासह केंद्र चालकाची भेट घ्यावी. केंद्र चालक हे संगणकीय प्रणालीद्वारा विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांकाच्या आधारे संबंधित शेतकऱ्याची कर्जखात्याची माहिती पोर्टलवरून प्राप्त करेल. शेतकऱ्यांनी संगणकावर दिसणारी कर्जखात्याची माहिती व आधार क्रमांक याची पडताळणी करावी. त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्येक कर्ज खात्याची रक्कम किमान आधार कार्ड क्रमांक याबाबत मानक कार्यप्रणालीमधील पध्दतीनुसार मान्यता किंवा अमान्यता देईल.

जर शेतकऱ्याने त्याच्या नावापुढे दर्शविलेल्या तपशीलांना सहमती दर्शविली आणि प्रमाणिकरण केले तर त्याच्या कर्जमाफीची रक्कम थेट त्याच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. एकवेळ समझोता योजनेबाबत त्याचा वाटा भल्यानंतर ही रक्कम जमा होईल. एकवेळ समझोता योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहील.

ज्या प्रकरणात शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता योजना स्विकारली आहे व ज्यांनी विहित मुदतीत त्यांच्या हिश्याची रक्कम बँकेत भरणा केली आहे, अशा कर्जखात्यांची माहिती बँकेमार्फत दरमहा संगणकीय प्रणालीवर सादर केली जाईल. आधार जोडणी शिल्लक असलेल्या कर्जखात्यांची माहिती प्रणालीवर सादर करण्यासाठीचा दुसरा टप्पा सुरु होईल. यासाठी आधार प्रमाणिकरणाची यादी निर्गती, लाभ रक्कम वर्ग करण्यासाठी कर्जखात्यांचे संगणकीय संस्करण कार्यवाही प्रत्येक टप्प्यामध्ये वर नमुद केल्याप्रमाणे राहील.

आधार प्रमाणिकरणासाठी निर्गमित केलेल्या याद्यांमध्ये शेतकऱ्यास त्याच्या कर्जखात्याची माहिती आढळून न आल्यास त्यास तहसीलदार किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार अर्ज देता येईल. त्यानंतर या तक्रारी जिल्हास्तरीय समन्वय समितीकडे पाठविण्यात येतील. सदर समिती संबंधित बँकेच्या मदतीने योजनेच्या मार्गदर्शक पध्दतीनुसार तक्रारींचे निराकरण करील.

प्रमाणिकरण झालेल्या सर्व कर्जखात्यांच्या संस्करणानंतर गावनिहाय व बँक शाखानिहाय लाभार्थ्यांची अंतिम यादी लाभ रकमेसह प्रणालीमार्फत उपलब्ध केली जाईल. सदर यादीची गावनिहाय प्रसिध्दी तलाठी, ग्रामसेवक व विकास संस्था गटसचिव यांच्यामार्फत गाव चावडीवर करतील. सदरची यादी बँकेसुध्दा प्रसिध्द करण्यात येईल. योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाल्यानंतर सर्व बँका कर्जमाफीबाबतचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देतील.

 

राजेश का. येसनकर

                                                                                                            जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

00000

No comments:

Post a Comment