Search This Blog

Thursday, 9 July 2026

कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने


कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026

चंद्रपूर, दि. 9 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 च्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ हे तीन प्रमुख घटक आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 43 हजार 816 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 28 हजार 572 कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

राज्य शासनाने 'महाआयटी'च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार करण्यात येत आहे. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत मिळणा-या लाभाबाबतची माहिती बँकेच्या व जिल्हास्तरीय यंत्रणेच्या सहकार्याने गाव, चावडी, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र व विकास संस्थेच्या नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. लाभार्थी ओळखीसाठी आधार क्रमांक हा मुख्य निकष असेल. आधार क्रमांकाशी जोडणी नसलेल्या कर्ज खातेदारांची यादी बँकेच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

सदर याद्या कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेसाठी बँक शाखानिहाय व गावनिहाय तयार केल्या जातील. यामध्ये विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, बँकेचे नाव, शाखेचे नाव, कर्ज खाते व एकूण थकीत रक्कम, कर्जमाफीची रक्कम (शासनाने द्यावयाची), शेतकऱ्यांनी भरावयाची एकवेळ समझोता याचा तपशील राहील. संबंधित शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँक शाखेत जाऊन त्यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणीकरण करावे. तसेच विशिष्ट क्रमांक व आधार कार्डासह आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा/नागरी सुविधा केंद्र येथे जावून शेतकऱ्यांनी संगणकावर दिसणारी कर्जखात्याची माहिती व आधार क्रमांकाची पडताळणी करावी.

जर शेतकऱ्याने त्याच्या नावापुढे दर्शविलेल्या तपशीलांना सहमती दर्शविली आणि प्रमाणिकरण केले तर कर्जमाफीची रक्कम थेट त्याच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. एकवेळ समझोता योजनेबाबत त्याचा वाटा भरल्यानंतर ही रक्कम जमा होईल. एकवेळ समझोता योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहील.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या चार स्वतंत्र याद्या : 1) कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी (सर्वसाधारण) 2) महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी (पुनर्लाभ) 3) एकवेळ समझोता योजनेनुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी (सर्वसाधारण) 4) एकवेळ समझोता योजनेत महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफीस पात्र असलेली यादी (पुनर्लाभ).

येथे करता येईल तक्रार : आधार प्रमाणिकरणासाठी निर्गमित केलेल्या याद्यांमध्ये कर्जखात्याची माहिती आढळून न आल्यास संबंधित शेतकरी, तहसीलदार किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर या तक्रारी जिल्हास्तरीय समन्वय समितीकडे गेल्यानंतर, बँकेच्या मदतीने योजनेच्या मार्गदर्शक पध्दतीनुसार तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.

००००००

No comments:

Post a Comment