Search This Blog

Wednesday, 22 July 2026

वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

 

वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ø पीक विमा नोंदणीसाठी Farmer ID च्या अनिवार्यतेतून सूट

Ø सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै

चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी आणि जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप 2026) अंतर्गत नोंदणीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) सादर करण्याच्या अनिवार्यतेतून केंद्र शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत फार्मर आयडी नसल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात खरीप 2016 पासून राबविण्यात येत असून, खरीप 2026 व रब्बी 2026-27 या कालावधीसाठी सुधारित योजनेला शासनाने मान्यता दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची निवड करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, या अटीमुळे जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी आणि जिवती तालुक्यातील अनेक शेतकरी नोंदणी करू शकत नव्हते.

ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र शासनाने या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी च्या अनिवार्यतेतून सूट देण्याचा निर्णय घेतला. यामुळे संबंधित शेतकरी आता राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून, पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखा किंवा आपले सरकार सेवा केंद्रात विहित मुदतीत विमा हप्ता भरून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर मा. तोटावार यांनी केले आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment