सुधारीत निकषानुसार भरावे लागणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज
Ø अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 पर्यंत
चंद्रपूर, दि. 28 : माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाने ग्रामपंचायत स्तरावरील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी सुधारीत गुणांकन पध्दती लागू केल्यामुळे जिल्ह्यातील 633 ग्रामपंचायत स्तरावरील सदर केंद्र मंजुरीसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 आहे.
यापूर्वी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी 2 मार्च 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून 20 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याच्या www.chanda.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या 9 जुलै 2026 च्या पत्रान्वये मंजुरीसाठीच्या गुणांकन निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित गुणांकन पद्धती लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी राबविण्यात आलेली मंजुरीची प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील, शासनाने विहित केलेल्या सुधारित अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सुधारीत निकषानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर रिक्त सेवा केंद्रांची ग्रामपंचायतनिहाय यादी, अर्जाचा नमुना, सुधारित अटी व शर्ती तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती www.chanda.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, व संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक व परिपूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment