Search This Blog

Wednesday, 15 July 2026

'जय सिद्धी विनायक' कंपनीतील गुंतवणूकदारांनी दोन दिवसांत कागदपत्रे सादर करावीत


'जय सिद्धी विनायक' कंपनीतील गुंतवणूकदारांनी दोन दिवसांत कागदपत्रे सादर करावीत

Ø आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : "जय सिद्धी विनायक" (JSV) कंपनीतील गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीसंबंधीची आवश्यक कागदपत्रे तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्याची माहिती तातडीने आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे सादर करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केले आहे.

दि. ८ जुलै २०२६ रोजी भरत बाबुराव दिघोरे (रा. इंदाळा, ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील फसवणूक व विश्वासघाताशी संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण (MPID) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात "जय सिद्धी विनायक" (JSV) कंपनीचे संचालक विजयालक्ष्मी कटेत (भोपाळ), दिनेश टेंभरे (आमगाव), योगेश रेहपाडे (चंद्रपूर) आणि निखिल शेंडे (लाखांदूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी विविध आकर्षक ठेवी योजनांच्या माध्यमातून ६५९ गुंतवणूकदारांची सुमारे ९३ लाख ९२ हजार १७५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण अधिनियमांतर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, भंडारा यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक रक्कम परत करण्याबाबत न्यायालयाने आदेशही दिले आहेत.

यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे सादर केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी आता आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत किंवा बँक खात्याची माहिती दोन दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment