Search This Blog

Wednesday, 7 October 2026

191 आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी


191 आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी

Ø सेवा संकल्प अभियानातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती

चंद्रपूर, दि. 07 : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकित पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दंत व मुख आरोग्य तपासणीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 63 शाळांमधील विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी करण्यात येणार असून गोजोली येथील श्रीराम उच्च माध्यमिक व प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित शिबिरात 191 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

मौखिक आरोग्य कक्ष व दंत विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गोजोली येथे आयोजित शिबिरात डॉ. संदीप पिपरे यांनी विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभियानासह मौखिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. दातांची रचना व प्रकार, दातांची कीड, दुभंगलेले ओठ, हिरड्यांचे आजार याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच दात योग्य पद्धतीने कसे घासावेत, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.

तंबाखू, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, मौखिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. शिबिरात दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे, डॉ. रवींद्र गेडाम, डॉ. मृणाल बंडीवार आणि डॉ. स्मिता दास यांनी एकूण 191 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी केली.

तपासणीमध्ये 72 विद्यार्थ्यांना स्केलिंगचा, 6 विद्यार्थ्यांना दातांच्या पुनर्स्थापना उपचाराचा सल्ला देण्यात आला. 47 विद्यार्थ्यांमध्ये दातांची कीड, 3 विद्यार्थ्यांमध्ये फ्लोरोसिस आढळून आले. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य उत्तम व दात स्वच्छ आढळून आले, अशा विद्यार्थ्यांचा डॉ. संदीप पिपरे व डॉ. रवींद्र गेडाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना शक्यतेनुसार मोबाईल डेंटल व्हॅनद्वारे उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे संदर्भित करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment