Search This Blog

Wednesday, 2 December 2020

गत 24 तासात 162 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 162 कोरोनामुक्त

168 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 18,066 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,909

 

चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 162 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 168 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 283 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 66 झाली आहे. सध्या एक हजार 909 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 900 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 29 हजार 371 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा शहरातील 48 वर्षीय पुरूष व चंद्रपूर तालुक्यातील घंटाचौकी येथील 47 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 308 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 285, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 168 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 53, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर तालुक्यातील आठ, भद्रावती 34, ब्रम्हपुरी नऊ, नागभिड सात, मुल दोन, सावली दोन, गोंडपीपरी दोन, राजुरा सहा, चिमुर 23, वरोरा 10, कोरपना चार व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी भूलथापांना बळी पडू नये

 व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी भूलथापांना बळी पडू नये

चंद्रपूर, दि. 2 डिसेंबर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी www.mytadoba.org या अधिकृत संकेतस्थळावरच परवाना आरक्षित करण्यात यावा. पर्यटन आरक्षण करुन देण्यासाठी कोणत्याही ऐजंटची नियुक्ती केलेली नसून पर्यटकांनी भूलथापांना बळी पडून कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन विभागीय वनअधिकारी एस.एस.भागवत यांनी केले आहे.

नुकतेच नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद रुपचंद सोनुले यांनी सचिन संतोष कोयचाडे नावाचे खाजगी व्यक्तीमार्फत पर्यटकांकडुन पैसे घेऊन प्रवेशद्वारावरुन अनाधिकृतपणे जिप्सी सोडत असल्याची कबुली दिली. संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता असा अवैध प्रकार यापूर्वी अनेकदा केला असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलीस स्टेशन चिमूर येथे लेखी फिर्याद देण्यात आली व एफ आय आर  दाखल करण्यात आली. सदरहू कार्यवाही करण्यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव ) सतीश शेंडे व इतर वनकर्मचारी यांनी कामगिरी बजावली असल्याचे विभागीय वनअधिकारी भागवत यांनी कळविले आहे.

0 0 0


Tuesday, 1 December 2020

चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे 67.47 टक्के मतदान




 

चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे 67.47 टक्के मतदान

          चंद्रपूर, दि. 1 :  नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातून अंदाजे 67.47  टक्के मतदान करण्यात आले. आज सकाळी 8 वाजेपासूनच मतदारांनी जिल्ह्यातील 50 मतदान केंद्रावर सर्वत्र उत्साहात व शांततेने मतदान केले.

जिल्ह्यात 22 हजार 33 पुरूष, 10 हजार 723 स्त्री व इतर 5 असे 32 हजार 761 पदवीधर मतदार होते. त्यापैकी अंदाजे 15 हजार 658 पुरूष, 6 हजार 444 स्त्री व इतर 1 अशा एकूण 22 हजार 103 एकूण मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कुल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देवून पाहणी केली. तसेच अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजोरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केद्रावर भेट देवून पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेटी देवून निवडणूक प्रक्रीयेची पाहणी केली.

         मतदान केंद्रावर सामाजिक दुरीतेचे पालन करण्यात आले. प्रत्येक मतदार रांगेत रेखांकित केलेल्या वर्तुळात उभे होते. हॅन्ड सॅनिटराईज केल्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतदारांना प्रवेश नव्हता. मतदानापूर्वी थर्मल स्क्रिनींग, ऑक्सिमीटरद्वारे मतदारांची तपासणी करण्यात येत होती. शिवाय मतदान केंद्रावर प्रथमोपचाराची सुविधा देखील उपलब्ध होती. मतदारांचे तापमान, हँड सँनिटाईज, तसेच ऑक्सिमटरने ऑक्सिजनचे प्रमाणही तपासण्यात येत होते, येथे मतदाराच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करत काळजी घेतली. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन मतदान अधिकारी व एक पीठासीन अधिकारी अशी चमू कार्यरत होती.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 7.77 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 18.94 टक्के, दुपारी 2 वाजेपर्यंत 36.89 टक्के, 4 वाजेपर्यंत 54.16 टकके तर 5 वाजेपर्यंत अंदाजे 67.47 टक्के मतदान झाले.

 

****

कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 हजाराचा टप्पा

 


कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 हजाराचा टप्पा

गत 24 तासात जिल्ह्यात चौघांचा मृत्यू

167 नव्याने पॉझिटिव्ह ; 72 कोरोनामुक्त

 

Ø  आतापर्यंत 17,904 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,905

 

चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला असून 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. यासोबतच सुरवातीपासून आतापर्यंत बाधीत झालेल्यांची एकूण संख्या 20 हजार 115 वर पोहचली आहे.

तसेच 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 904 झाली आहे. सध्या एक हजार 905 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 50 हजार 947 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 28 हजार 408 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल भद्रावती येथील 59 वर्षीय महिला, वडगाव चंद्रपूर येथील  62 वर्षीय पुरूष, चिंचाळा, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरूष तसेच सावरघाटा, सिंदेवाही येथील 41 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 306 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 283, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 167 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 66, चंद्रपूर तालुक्यातील 11, बल्लारपुर तालुक्यातील 15, भद्रावती 11, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मुल 12, पोभुर्णा एक, गोंडपीपरी एक, राजुरा 10, चिमुर चार, वरोरा 27, कोरपना एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये शासनाच्या मार्गदर्शक सूचना

 महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये

शासनाच्या मार्गदर्शक सूचना

Ø  चैत्यभुमी येथील कार्यक्रमाचे दुरर्दशनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार

Ø  घरुनच अभिवादन करण्याचे आवाहन

 

                       

चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे न जाता घरूनच अभिवादन करावे अशा मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चैत्यभूमी, दादर, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत राज्य शासनाने पुढील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण व उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामुळे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक ०६ डिसेंबर, २०२० रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभुमीवर पुर्ण खबरदारी घेवुन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा. कोविड विषाणुच्या पार्श्वभुमीवर चैत्यभुमी, दादर येथे येण्यावर निर्बंध असल्याने व दादर तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभुमी येथील कार्यक्रमाचे दुरर्दशनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभुमी दादर येथे न येता घरातुनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, त्यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे तसेच घरी राहुनच परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची सर्व अनुयायांना विनंती करण्यात यावी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे व तालुके यामध्ये आयोजित करण्यात येत असल्याने महापरिनिर्वाण दिनी होणाऱ्या गर्दीवर निर्बंध घालण्यात यावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

वरीलप्रमाणे राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000