Search This Blog

Wednesday, 4 May 2022

पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी


 

पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी

Ø प्रभारी जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता पथकाचा आढावा                                               

चंद्रपूर दि. 4 मे : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा दक्षता पथकाचा आढावा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मेश्राम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्लेलवार, डॉ. स्नेहा उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सिंग, डॉ. अंकूश राठोड, डॉ. गोपाल भगत, डॉ. रोहन झाडे, डॉ. इंदूरकर, डॉ. वाघधरे, डॉ. रवि गावंडे, ॲङ मंगला बोरकर आदी उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या सोनोग्राफी केंद्राच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 50 सोनोग्राफी केंद्रात 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी करण्यात आली. यात वरोरा येथील 8 सोनोग्राफी केंद्रातील 1255 एफ फॉर्म, भद्रावती येथील 5 केंद्रात 330, बल्लारपूर येथे 3 केंद्रात 272, मुल येथील 2 केंद्रात 199, ब्रम्हपूरी 15 केंद्रात 3718, राजुरा 2 केंद्रात 343, सिंदेवाही 3 केंद्रात 994, गडचांदूर 2 केंद्रात 543, सावली 1 केंद्रात 266, नागभीड 3 केंद्रात 509, घुग्घुस 2 केंद्रात 17,  चिमूर 3 केंद्रात 249 आणि गोंडपिपरी येथील 1 केंद्रात 508 एफ फॉर्मचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

तालुका स्तरावर ज्यांनी दक्षता पथकाच्या बैठका नियमित घेतल्या नाही, त्याबाबत प्रभारी जिल्हाधिका-यांनी नाराजी व्यक्त करून अशा बैठका नियमित घेण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी सोनोग्राफी केंद्राची तपासणी, केंद्राची नोंदणी व नुतणीकरण, जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या बैठका, न्यायालयीन प्रकरणे, टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारीवर करण्यात आलेली कार्यवाही, स्त्री भ्रुण हत्या टाळण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली जनजागृती आदींबाबत त्यांनी आढावा घेतला.

०००००००

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

 

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

Ø 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 4 मे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे.

दि. 9 मे 2022 पासून टॅलेंट सर्च मोहीम राबविली जाणार असून यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिल्या जाणार आहे.  राज्यातील एकूण 9 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय उपसंचालक कार्यालय, नागपूर येथे दि. 19 ते 20 मे 2022 या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करावयाचे आहे.  या चाचणीत निकषांची पूर्तता करून राज्यस्तर चाचणी करीता खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी, ज्युडो, हँडबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल-टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक या खेळांचा समावेश आहे.

ज्या खेळाडूंचे वय 19 वर्षाच्या आतील आहे, अशा खेळाडूंची या निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी तंत्रशुद्ध प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, शासनाच्यावतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित करून तसेच राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

उपरोक्त क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणीकरीता पदक प्राप्त, राष्ट्रीय सहभागी खेळाडूनी दि. 17 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे व अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड इत्यादी कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 2 May 2022

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शिकेचे विमोचन व स्टॉलचे उद्घाटन

 



पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शिकेचे विमोचन व स्टॉलचे उद्घाटन

चंद्रपूर दि. 2 मे : महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिनी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचे वाटप तसेच मार्गदर्शन माहितीचे प्रदर्शन असलेल्या स्टॉलचे उद्घाटन मार्गदर्शिकेचे विमोचन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा जात पडताळणीचे उपायुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, अधीक्षक मनोज माकोडे, महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच बार्टी समतादूत प्रामुख्याने उपस्थित होते.

            महाराष्ट्र दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या, तहसील कार्यालय, नगरपंचायती, महानगरपालिका, शाळा आदी ठिकाणी मार्गदर्शिका व माहिती पुस्तके वाचून दाखवण्यात आले व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

000000

ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व जलजीवन मिशनवर फोकस करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 





ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व जलजीवन मिशनवर फोकस करा पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø चंद्रपूर जिल्हा परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष

Ø जिल्ह्यातील 300 शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस

चंद्रपूर दि. 2 मे : महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला होता. मात्र आपला प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. ग्रामीण भागातील लोढा शहरांकडे येत असल्याने शहरांवरचा ताण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या उपलब्धतेसोबतच, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी आदी बाबी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने ग्रामीण भागावर फोकस करावा. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी जि.प.अध्यक्षा संध्या गुरुनुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकाश देवतळे उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दोन वर्षानंतर 1 मे रोजी जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानली जाते. ज्यावेळी जिल्हा परिषदेला चांगले अधिकारी मिळाले, त्या त्या वेळेस जिल्हा परिषदेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. विकास सुचविणे आणि विकास करून घेणे हे लोकप्रतिनिधीचे काम असले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याने आणि नियमाने काम करावे.

ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत पालकमंत्री म्हणाले, शिक्षण हे आपले ‘ॲसेट’ आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील 20 याप्रमाणे 300 शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा उभा करण्यासाठी या शाळांमध्ये डीजीटायझेशन करू. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावे. त्या त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षकाद्वारे एकाच वेळी 300 शाळांत ऑनलाईन पध्दतीने शिकविता आले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परिक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आतापासून एक तास अभ्यास करायला पाहिजे, असे नियोजन करा.

आरोग्याबाबत पालकमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम झाले आहे. केवळ इमारती बांधून चालणार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा, वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देऊ. तसेच नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळाले तरच आपण निरोगी राहू. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या अंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी. त्याची तपासणी करण्यात येईल, जिल्हा परिषदेने  शिक्षण, आरोग्य आणि जलजीवन मिशन यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरीता निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

60 वर्षात जिल्हा परिषदेने या जिल्ह्यात चांगले काम केले. त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. भविष्यातही आणखी चांगले काम करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, सद्यस्थितीत 29 पैकी केवळ 14 विषय जिल्हा परिषदेकडे आहेत. जिल्हा परिषदेने योजनांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी व जनजागृती करावी. सर्व अधिका-यांमध्ये योग्य समन्वय ठेवून सर्व विभागप्रमुखांचे वर्षातून दोनदा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तर प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव ही आनंदाची बाब आहे. 60 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले. संचालन सावन चालखुरे, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

विकासाच्या बाबतीत सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदलणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 









विकासाच्या बाबतीत सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदलणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø रस्ते, पूल, पांदणरस्ते, शासकीय इमारती आदींचा समावेश

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन

चंद्रपूर दि. 2 मे : सिंदेवाही आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे उड्डाण पूल, विविध शासकीय इमारतींचे बांधकाम, सिंचनाच्या सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी, पांदणरस्ते आदी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत. एकूणच या परिसराच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतुद केली असून पुढील दोन वर्षात सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सिंदेवाही येथे 33 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शिवाजी चौक ते स्मशानभुमी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगर पंचायतीचे अध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयूर सुचक, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, उपअभियंता माधव गावड, हसनअली गिलानी, सुनील उट्टलवार, रमाकांत लोधे, अरुण कोलते, सीमा सहारे, रघुनाथ शेंडे, बापूराव गेडाम, विरु जयस्वाल आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांना पालकमंत्री म्हणाले, आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 62 वर्षे पूर्ण झाली असून या राज्याने देशात विकासाचे शिखर उभे केले आहेसामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने देशाची मान उंचावली आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याची प्रगती ही सुरवातीपासूनच उल्लेखनीय राहिली आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले, पूर्वीच्या आणि आताच्या सिंदेवाहीत नागरिकांना विकासात्मक बदल जाणवत आहे. या परिसराचा विकास आणि सेवेच्या बाबतीत कोणतीही कमतरता राहू देणार नाही. येथील मुख्य शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा आणि सौंदर्यीकरणासाठी 2 कोटी 50 लक्ष तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी 15 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय येथील विश्रामगृहासाठी 2 कोटी, नगर पंचायतीची प्रशासकीय इमारत 3 कोटी, तहसील कार्यालय इमारत 14 कोटी, पंचायत समिती इमारत 12 कोटी 36 लक्ष, सिंदेवाही-पाथरी रेल्वे उड्डाणपूल 92 कोटी, ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान 40 कोटी, आठवडी बाजार विकसीत करणे 2 कोटी, कर्मचारी निवासस्थान बांधकाम 8 कोटी 24 लक्ष, क्रीडा संकूल 7 कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था 4 कोटी 91 लक्ष,  लेंढाळा तलाव सौंदर्यीकरण 10 कोटी अशा विविध विकासकामांसाठी दोन वर्षात निधी प्रस्तावित आहे.

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आगामी काळात आश्वासक तोडगा काढण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे नियोजन आहे. यासाठी 22 कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे. पुढील काळात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेण्यात येईल. या परिसरात एकही पांदण रस्ता शिल्लक राहणार नाही. 300 किलोमीटरचे पांदण रस्ते आराखड्यात घेण्यात येत आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी सन्मानाने वागावे. नगरसेवकांनी लोकांच्या छोट्या छोट्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सिंदेवाही - लोनवाही येथील शांतीधाम स्मशानभुमी अंदाजित किंमत 1 कोटी 50 लक्ष, आठवडी बाजार बांधकाम व खुले भुखंड विकसीत करणे अंदाजित किंमत 2 कोटी 50 लक्ष या कामांचे सुध्दा भुमिपूजन करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री. कोठारी म्हणाले, येथील मुख्य रस्त्यासाठी पहिले 13 कोटी व नंतर 20 कोटी अशी एकूण 33 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. दोन वर्षात चार पदरी रस्ता येथे होणार असून विभाजक, पेवर ब्लॉक, दोन किमी नालीचे बांधकाम आदीचा यात समावेश आहे. यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

00000