Search This Blog

Friday, 1 September 2023

चंद्रपुरात होणार अद्ययावत वातानुकूलित बॅडमिंटन हॉल


चंद्रपुरात होणार अद्ययावत वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 5 कोटी 39 लक्ष मंजूर

चंद्रपूर, दि. 1 : खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावीयासाठी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता चंद्रपुरात सर्व सोयीसुविधायुक्त असा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी 5 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केले आहेत.

नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलानंतर विभागातील दुसरा वातानुकुलित बॅडमिंटन हॉल चंद्रपुरात होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर येथे सिनीयर राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा प्रथमच चंद्रपुरात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून बॅडमिंटनचे खेळाडू चंद्रपूर येथे स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे अद्ययावत बॅडमिंटन हॉलचा आराखडा तयार करून हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविणेप्रकाशझोताची व्यवस्था करणेआसन व्यवस्थाअद्यावत प्रसाधनेवुडन फ्लोरिंगवोवाकोट सिंथेटिकसोलर सिस्टिमएकॉस्टिक सिस्टीमपब्लिक एड्रेस सिस्टीमड्रिंकिंग वॉटर सिस्टीम इत्यादी सुविधेचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

खेळाडूंमध्ये आनंद :

बॅडमिंटन हॉलसाठी क्रीडांगण विकास योजनेतून 5 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बॅडमिंटन हॉलचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. भविष्यात या ठिकाणी बॅडमिंटन सह विविध क्रीडाप्रकार खेळले जाणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जलतरण तलाव लवकरच :

यापूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात जलतरण तलावासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर जिल्हा क्रीडा संकूल येथे सिंथेटिक ट्रॅकसाठी 12 कोटी रुपये आणि वॉकिंग ट्रॅकसाठी 51 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

००००००

आता…न्यायालयीन प्रकरणांसाठी मिळणार मोफत वकील


आता…न्यायालयीन प्रकरणांसाठी मिळणार मोफत वकील

Ø आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीसांठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

चंद्रपूर, दि. 01 : न्यायालयाची पायरी चढू नये, असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. परंतु आपल्या अधिकारांसाठी आपल्याला न्यायालयात जावे लागते किंवा फौजदारी प्रकरणात समाविष्ट असल्यास उपस्थित राहावे लागते. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीने दाद मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणे परवडणारे नसते. अशा दुर्बल घटकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर धावून येते. निर्धारित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो. पैसे नाहीत म्हणून कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, हा मोफत विधी सेवा योजनेचा उद्देश आहे.

मोफत वकील मिळण्यासाठी पात्र घटक :

महिला व 18 वर्ष वयापर्यंतची बालके, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीक, कारागृहात किंवा पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी, 3 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती, औद्योगिक कामगार, मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती, पूर,भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती व जातीय हिंसा पिडीत व्यक्ती आदी घटक मोफत वकील मिळण्यासाठी पात्र आहेत.

मोफत वकील मिळण्यासाठी या ठिकाणी करा अर्ज :

सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथील कार्यालयात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका न्यायालयात असलेल्या तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा.

लोक अभिरक्षक कार्यालयाची निर्मिती :

फौजदारी प्रकरणात असलेले न्यायालयीन बंदी यांच्यासाठी मोफत विधी सहाय्य दिले जाते. वरील सुविधा मिळण्यासाठी अर्ज आल्यास लोक अभिरक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पाच तज्ञ वकिलामार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते. सदर कार्यालय दि. 13 मार्च 2023 पासून जिल्ह्यात मुख्यालयासाठी कार्यरत आहे.

8 महिन्यात 310 नागरिकांना मोफत वकील :

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरमार्फत माहे जानेवारी ते माहे ऑगस्ट 2023 या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एकूण 310 नागरीकांना मोफत विधी सहाय्य पुरविण्यात आले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

००००००

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू  

चंद्रपूर, दि. 01 : जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आदोंलने, जातीय सामाजिक संघटनाकडून करण्यात येणारी आदोंलने, निदर्शने, मोर्चा तसेच अतिमहत्त्वाचे व्यक्तीचे दौरा तसेच दि. 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती व दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी पोळा हा सण असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे  कलम  37 (1) (3)  नुसार  जमावबंदी आदेश लागू केले आहे.

या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर आदेश दि. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता  लागू राहील, असे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

००००००

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

 हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 01 : महाकाली वार्ड येथील रहिवासी रिना अरुण राजपुत यांच्या तोंडी तक्रारीवरुन मुलगा नामे अथर्व अरुण राजपुत वय 17 वर्ष 11 महिने, हा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता बागला चौक येथे आईचे घरी जातो सांगून घरुन निघुन गेला. मात्र, तो घरी आला नाही. वार्डात, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता आढळून आले नाही, असे तक्रारीत नमुद आहे.

हरविलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे :

सदर मुलाचे वय 17 वर्ष, उंची 4 फूट 5 इंच, चेहरा लांबट, वर्ण- निमगोरा, अंगात निळ्या रंगाची टी-शर्ट व काळ्या रंगाचा फुलपॅन्ट परीधान केलेला आहे.

सदर वर्णनाचा मुलगा आपल्या परिसरात आढळून आल्यास शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर 07172-252200 या क्रमांकावर किंवा पोलीस नियत्रंण कक्ष 07172-273258 तसेच तपास अधिकारी विजय मुळे 9923401065 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून हरवलेल्या मुलाची माहिती द्यावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

००००००

जागेची मालकी कंपनीची असल्यामुळे नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास अडचण

 जागेची मालकी कंपनीची असल्यामुळे नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास अडचण

Ø गडचांदूर न.प. मुख्याधिका-यांचा खुलासा

चंद्रपूर, दि. 01 : गडचांदूर नगर परिषद ही सन 2014 मध्ये स्थापन झाली आहे. यापूर्वी तेथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. तेव्हापासून गडचांदूरच्या हद्दीत बंगाली कॅम्प येथे नागरिकांचे वास्तव्य आहे. बंगाली कॅम्प नावाने असलेल्या जागेचा मालकी हक्क सातबारा माणिकगड सिमेंट कंपनी यांच्या नावाने आहे. तरीसुध्दा तेथील रहिवास्यांना नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौच्छालयाचा लाभ देण्यात आला आहे. नागरिकांना देण्यात आलेल्या लाभाच्या विरोधात माणिकगड सिमेंट कंपनीने नगर परिषदेच्या विरोधात दिवानी दावा दाखल केला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

असे असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी गडचांदूर नगर परिषदेने 1 हातपंप, 2 सार्वजनिक नळाची व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी वगळता इतर आवश्यक कामाच्या वापरासाठी देखील पाणी पुरविण्यात येते. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता असते तेंव्हा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु सदर जागेची मालकी माणिकगड सिमेंट कंपनीची असल्यामुळे रस्ता, नाली व पथदिवे अशा पायाभुत सुविधा पुरविण्यास नगर‍ परिषदेला अडचण निर्माण होत असल्याचे न.प.मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांनी कळविले आहे.

००००००