Search This Blog

Thursday, 2 November 2023

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा

 जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा

चंद्रपूर, दि. 2 : केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. जिल्हृयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक पार पडली.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती पायघन, जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रशांत धोंगळे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. इंगळे तसेच डॉ. मंगेश गुलवाडे, सीएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक स्वप्नील सोनटक्के व  श्री. रमझान आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजना असून पारंपारिक उद्योजकांचा विकास साधण्याकरीता ग्रामसेवक व सरपंचांनी जास्तीत जास्त पारंपारिक कारागिरांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. तसेच योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी गावपातळीवर दवंडी देऊन, बॅनरच्या माध्यमातून सदर योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच ऑनलाईन सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबतच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना :

योजनेची उद्दिष्टे : कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्यवृध्दी प्रदान करणे, व्यवसाय आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण आणि सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपिठ प्रदान करणे, जेणेकरून, त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोईचे होईल, आदी या योजनेची उद्दीष्टे आहे.

योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ :

पारंपारीक कारागीर म्हणुन शासनमान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राव्दारे विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळेल. कौशल्य विकास (प्रशिक्षण), कौशल्य पडताळणीनंतर 5 ते 7 दिवस (40तास) मुलभत प्रशिक्षण, इच्छुक उमेदवारास 15 दिवस प्रगत प्रशिक्षण, दररोज  500 रुपये प्रशिक्षण विद्यावेतन आणि टुलकिट प्रोत्साहन म्हणून 15 हजार रुपये अनुदान देय राहील.

योजनेचे लाभार्थी असंघटीत क्षेत्रात स्वंयरोजगार तत्वावर हात-अवजाराने काम करणारे कारागीर, 18 कुंटुंब-आधारीत पारंपारीक व्यवसायापैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर, नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे वय किमान 18 वर्ष असावे. योजनेतंर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहतील. शासनसेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

पात्र कारागीर आणि व्यवसाय : सुतार/बोट निर्माता, लोहधातू, ब्राँझ, पितळ, तांबे, डायस, भांडी, मूर्ती बनविणारा, लोहार/हॅमर आणि टुलकिट मेकर, कुलुप बनविणारा, मुर्तिकार, स्टोन ब्रेकर, सोनार, कुंभार, मोची, शुस्मिथ, पादत्राणे कारागीर, गवंडी, ईतर जसे बास्केट, मॅट, झाडु निर्माता, काथ्याचा व्यवसाय करणारे, बाहुली आणि खेळणी निर्माता, न्हावी, माळी,  परिट, शिंपी आणि मासेमारी जाळी बनविणारे या योजनेस पात्र आहे.

ऑनलाईन अर्ज पध्दती योजनेतंर्गत लाभासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जवळच्या ग्रामपंचायत सी.एस.सी. केंद्रातून अर्ज करावा लागेल. युजर आयडी आणि पासवर्डव्दारे लॉगीन करून योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून कारागीरांना ओळखपत्र देण्यात येईल व तदनंतर कारागीराला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

आवश्यक कागदपत्रे : लाभार्थ्याच्या नोंदणीसाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक तपशील, शिधापत्रिका (नसल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड), अतिरिक्त कागदपत्रे अथवा  माहिती लाभार्थ्याना एमएसएमई विभागाने विहीत केलेल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे किंवा माहिती देणे आवश्यक राहील.

००००००

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन


हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 : गणपती मंदिर जवळ, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी कांचन निलेश शिवरकर (वय 41 वर्ष) ही महिला दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी  9 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून काहीही न सांगता घरून निघून गेली. महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही.

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय 41 वर्ष, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा लांबट, सडपातळ बांधा, अंगात निळ्या रंगाचा सलवार व काळया रंगाची लॅगिंग घातलेली आहे. डोक्याचे केस काळे व साधारण लांब, डोळे टपोरे, उजव्या पायाच्या घोटेजवळ काळा डाग आहे. सदर वर्णनाची महिला आढळून आल्यास चंद्रपूर,शहर पोलीस स्टेशन 07172-252200, पोलीस नियत्रंण कक्ष 07172-251200 तसेच तपासी अंमलदार 9766860222 यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  शहर पोलिस स्टेशन, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

Wednesday, 1 November 2023

रमाई घरकुल योजनेतील 3237 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे


 रमाई घरकुल योजनेतील 3237 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे

Ø 1265 त्रुटी असलेल्या घरकुलांच्या प्रस्तावालाही मिळाली मंजूरी 

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश

चंद्रपूरदि. 1 : जिल्ह्यातील रमाई आवास घरकुल योजनेचे (ग्रामीण) 3237 लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये 1265 त्रुटी असलेल्या घरकुलांच्या प्रस्तावालाही मंजूरी मिळाली असून या सर्व लाभार्थ्यांना हक्काचे घरे मिळणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता़ त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे.

रमाई घरकुल योजना (ग्रामीण) या योजनेअंतर्गत रमाई घरकुल निर्माण समितीची बैठक राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणेत्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. रमाई आवास योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुरीकरीता मागविण्यात आली होती.

रमाई आवास योजना (ग्रामीण) करीता सन 2023-24 या आर्थिक वर्षात तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये 15 तालुक्यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या सुरवातीला 1972 होती. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अनेकांनी या योजनेकरीता अर्ज केलेमात्र घरकुलापासून ते वंचित असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आले. या नागरिकांना घरकुल देण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेतला. त्यामुळे सुरवातीला रद्द झालले 1265 लाभार्थी रमाई घरकुल योजनेसाठी नव्याने पात्र ठरविण्यात आले. आता जिल्ह्यात एकूण 3237 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशी आहे नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या :

मुल तालुक्यामध्ये रद्द ऐवजी पात्र लाभार्थी संख्या 191जिवती तालुक्यात 24 लाभार्थीवरोरा 50 लाभार्थीनागभीड 102,  राजुरा 57गोंडपिपरी 261ब्रम्हपुरी 7 लाभार्थीकोरपना 54सावली तालुक्यात 366पोंभुर्णा तालुक्यात 33भद्रावती तालुक्यात 31 लाभार्थी तर बल्लारपूर तालुक्यात 89 लाभार्थी असे एकुण 1265 रद्द ऐवजी पात्र घरकुल लाभार्थ्यांची संख्या आहे.

००००००

बल्लारपूर विधानसभेला विकासाच्या मार्गावर कायम अग्रेसर ठेवणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार




 

बल्लारपूर विधानसभेला विकासाच्या मार्गावर कायम अग्रेसर ठेवणार  - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø निरंतर विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास

Ø बल्लारपूर येथे 4 कोटींच्या रस्ता बांधकामाची पायाभरणी

चंद्रपूरदि. 1 : ‘बल्लारपूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला विकास करण्याची संधी मिळाली आहे. बल्लारपूर हा तालुका महाराष्ट्राच्या एका टोकाला असला तरीही विकासाच्या बाबतीत राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. मी या विधानसभेच्या निरंतर विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहेत्यामुळे भविष्यात सुद्धा बल्लारपूरची विकासाची घोडदौड अशीच कायम राहील,’ अशी ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर येथील सिताबाई सावरकर चौक ते डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम चौक पर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगतापन.प. मुख्याधिकारी विशाल वाघकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेचंदनसिंग चंदेलहरीष शर्माकाशिनाथ सिंहदेविदास उमरेविकास दुपारेमनिष पांडेनीलेश खरबडेअरुण वाघमारे आदी उपस्थित होते.

कितीही विकास केला तरी बल्लारपूर येथील नागरिकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेअनेक वर्षांपासून शहरातील डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड ते राजेंद्र वॉर्ड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार या रस्त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना सा.बा. विभागाला दिल्या व 4 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. निधी मंजूर झाला असला तरी रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेसोबतच स्थानिक नागरिकांची सुध्दा आहे. कारण आपल्या अनेक पिढ्या या परिसरात राहात आल्या आहेत व भविष्यातसुध्दा राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम हे उत्तमच व्हायला पाहिजे, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावेअशा सुचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

घरकुल पट्टे देण्यासाठी विशेष मोहीम : वर्षानुवर्षे महसूलच्या जमिनीवर वास्तव्य करणा-या कुटुंबाना घरकुल पट्टे देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र रेल्वे आणि वन विभागाच्या जमिनीबाबत केंद्र सरकारचे नियम आहेत. त्यामुळे या जमिनीवरील घरकुल पट्टे देण्यासाठी केंद्र सरकार सोबत बोलणी सुरू आहेअसे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

        एकाच दिवशी तीन कामांचे भुमिपूजन  : बल्लारपूर येथे एकाच दिवशी मिनी स्टेडीयमच्या कामाचे भुमिपूजन (1 कोटी 29 लक्ष)सिमेंट रस्त्याची पायाभरणी (4 कोटी) आणि न.प. इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी (10 कोटी) करण्यात आली आहे.

स्थानिकांचा सत्कार : यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देवराव निंबेकरप्रभाकर वैद्यप्रकाश जमदाडेप्रभाकर पोटेकाशीनाथ पचारेदेविदास उमरेमारोती वाळकेसदर्शन मोगराममोहम्मद मुसाजी आदींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

००००००

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हाधिका-यांचे कौतुक Ø प्रधान सचिवांनी पाठविले पत्र

 

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हाधिका-यांचे कौतुक

Ø प्रधान सचिवांनी पाठविले पत्र

चंद्रपूरदि. 1 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने करण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव, तालुका, शहर आणि जिल्ह्यातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कौतुक केले आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

27 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत अमृत कलश यात्रेचा राज्यस्तरीय समारोपीय कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. राज्यभरातून 900 स्वयंसेवक 414 कलश घेऊन ऑगस्ट क्रांती मैदान येथे दाखल झाले होते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांचा सुध्दा समावेश होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यात गावागावात शिलाफलकम तयार करून त्यात विरांची नावे लिहिणे व त्यांना नमन, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण,अमृत कलश, पंचप्रण शपथेतून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प आदी बाबी करण्यात आल्या.

चंद्रपूर येथे 23 ऑगस्ट 2023 रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे करण्यात आला. तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्यावतीने  साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

००००००