Search This Blog

Tuesday, 2 April 2024

2064 मतदार करणार गृहमतदान




2064 मतदार करणार गृहमतदान

Ø मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या अधिकारी / कर्मचा-यांना सुचना

चंद्रपूर, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.  त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील एकूण 1239 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 163 आहे. ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदान करणार आहेत. या मतदारांनी गृहमतदाना करीता आवश्यक असलेला फॉर्म 12 – डी प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. भारत निवडणूक आयोगाने सुद्धा पहिल्यांदाच 85 वर्षांवरील नागरीक आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग बांधवांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांना नमुना 12 – डी देण्यात आला.  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 तर 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या मतदारांची संख्या 163 आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय गृह मतदान करणारे मतदार : राजूरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 325 आणि दिव्यांग 21 मतदार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 175 आणि दिव्यांग 16, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 56,  वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 213 आणि दिव्यांग 39 मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघातील 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत.

मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सुचना : गृहमतदानासंदर्भात अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण नुकतेच नियोजन भवन येथे घेण्यात आले. यात फॉर्म 13 - ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 - बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 - सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 - डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांना माहिती देण्यात आली. अतिशय अचूक पध्दतीने गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडायची असून त्याची गोपनीयता सुद्धा पाळणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आले. प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, रविंद्र माने आदी उपस्थित होते.

अशी राहील प्रक्रिया : गृहमतदानासाठी घरी जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी डिक्लेरेशन म्हणजे फॉर्म 13 – ए अचूक भरून घ्यावयाचे आहे. मतदान केलेल्या पत्रिकेची उभी घडी करून सदर पत्रिका छोटा लिफाफा म्हणजे फॉर्म 13 – बी मध्ये टाकावा. डिक्लरेशन आणि छोटा लिफाफा दोन्ही कव्हर बी लिफाफा म्हणजेच फॉर्म 13 – सी मध्ये टाकावा. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गृह मतदानाची व्हीडीयोग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक आणि व्हीडीओग्राफर सोबत राहणार आहे.

०००००

आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई

 

आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई

Ø लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन हायअलर्ट वर

चंद्रपूर, दि. 2 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिका-यांनी निर्गमित केले आहेत. 

अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिका-यांनी आदेश पारीत करताच शुभम अमर समूद (वय 26), रा. पंचशील वॉर्ड चंद्रपूर, शाहरुख नुरखा पठाण (वय 29), रा. अष्टभुजा वॉर्ड, जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा (वय 31), रा. लुंबिनी नगर, बाबुपेठ वॉर्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर (वय 25), रा. चिचघर ले-आऊट वरोरा, दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग (वय 22), रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, मुनीर खान वहिद खान पठाण (वय 55), रा. शिवनगर नागभीड,  शिवशाम उर्फ  भिस्सु दामोदर भुर्रे (वय 25), रा. हनुमान नगर, ब्रम्हपूरी यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये सहा महिन्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण 13 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापुजी उरकुडे (वय 45), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, प्रताप रमेश सिंग (वय 26), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, श्यामबाबू चंद्रपाल यादव (वय 29)  रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर, राजेश मुन्ना सरकार (वय 47), रा. इंडस्ट्रीय वॉर्ड, बंगाली कॅम्प चंद्रपूर, संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने  (वय 30), रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर, अरबाज जावेद कुरेशी (वय 26), रा. हवेली गॉर्डन चंद्रपूर यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये 6 महिने व 1 वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. 

सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम (वरोरा), सुधाकर यादव (चंद्रपूर), दीपक साखरे (राजुरा), दिनकर ठोसरे (ब्रम्हपूरी), तसेच उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे (वरोरा), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा), संदीप भस्के (ब्रम्हपूरी) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक आसिफराजा (बल्लारपूर), अनिल जिट्टावार  (ब्रम्हपूरी), विजय राठोड (नागभीड), सुनील गाडे (रामनगर, चंद्रपूर) आणि श्याम सोनटक्के (घुग्घुस) यांच्यावतीने करण्यात आली आहे.

००००००

Monday, 1 April 2024

अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक चार महिन्यांसाठी स्थानबद्ध

 

अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक चार महिन्यांसाठी स्थानबद्ध

Ø चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

चंद्रपूर, दि. : अवैध हातभट्टी दारू निर्मितीविक्री व वाहतूक करणाऱ्या व 1 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव (जाट) सिंदेवाही येथील नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या दारू व्यवसायिकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करत चार महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टींवर दारू निर्मितीविक्री व वाहतूक या विरुद्ध मागील 2 वर्षांपासून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात अवैध दारू विरुद्ध 951 गुन्ह्यांची नोंद करून 761 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 42 वाहने जप्त करून 99 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे. तसेच 1 पेक्षा ज्यास्त वेळा अश्याच प्रकारचे गुन्हे वारंवार करणाऱ्या 156 आरोपींविरुद्ध कलम 93 अंतर्गत प्रस्ताव तयार करून त्यातील 62 आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सुद्धा घेण्यात आले आहे.

मात्र याउपरही अवैध दारू व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या 4 आरोपींविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई प्रस्तावित केली असता नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या इसमाविरुद्ध 4 महिन्यांसाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पारीत केला आहे. एखाद्या दारू व्यावसायिकाविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश देण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

यापुढेही या स्वरूपाची सक्त कारवाई अवैध दारू व्यवसायाशी निगडीत व्यक्तींविरुद्ध सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशीतसेच संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त अनिल चासकर, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली ईश्वर वाघअभिजित लिचडेचेतन खारवडेमोनाली सुराडकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

०००००००

निवडणूक खर्चाची लेखे तपासणी 4, 12 व 16 एप्रिल रोजी


 निवडणूक खर्चाची लेखे तपासणी 4, 12 व 16 एप्रिल रोजी

चंद्रपूर,दि. : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून 2024 ची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक खर्चाचे लेख तपासणी करून घ्यावयाचे आहे. याकरीता दिलेल्या तारीख व वेळेत संबंधित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आले आहे.   

   13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया हे गुरुवार दि. 4 एप्रिलशुक्रवार दि.12 एप्रिल व मंगळवार दि.16 एप्रिल 2024 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सदर तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या वेळेतच उमेदवारांना आपले निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करावयाचे आहेत.

   जे उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील बाब क्र.77 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरतील. निवडणूक आयोगामार्फत अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे, यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

निवृत्ती वेतनधारकांनी मुळ बँक खाते सुरु ठेवावे

 

निवृत्ती वेतनधारकांनी मुळ बँक खाते सुरु ठेवावे

Ø ई - कुबेर प्रणालीद्वारे थेट जमा होणार पेन्शन

चंद्रपूर दि. 1 चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांचे मासिक निवृत्ती वेतन हे मार्च 2024 पासून ई - कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात जमा होणार असल्याने निवृत्तीवेतन धारकांनी आपले मुळ बँक खाते सुरू ठेवण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

पेन्शन जमा होण्यासाठी जी बँक निवृत्ती वेतनधारकांनी घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होणार आहे. जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात अथवा इतर बँकेत बदल करून घेतले असेल, अशा पेशनधारकांची पेन्शन जमा करण्यास अडचण निर्माण होतील. तरी ज्या पेन्शनधारकांनी बँक खाते इतर जिल्ह्यात अथवा इतर बँकेत बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मुळ बँक खाते ज्या बँकेत सुरु असेल तेच कायम ठेवावे. जेणेकरून निवृत्तीवेतन बँकेत जमा करण्यास अडचण जाणार नाही. तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

०००००