Search This Blog

Thursday, 2 May 2024

पशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन

 

पशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 : राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे.

तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय  खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले अर्थिक सहाय्य मिळणार नाही. नैसर्गिक आपत्तीविजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. पशुधनाची वाहतुक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्याआठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसलेले  पशुधन बाजार समिती मध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार  नाही, याची दक्षता संबंधीत बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करुन घेण्याची  जबाबदारी संबंधीत पशुपालकाची राहील.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडे  असलेल्या सर्व पशुधनास संबंधीत पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी संपर्क करुन इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे  व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

०००००००

बहुजन कल्याण विभागाच्या सुधारीत ई-मेलवर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

 बहुजन कल्याण विभागाच्या सुधारीत ई-मेलवर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 2 : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालय नव्याने सुरु झालेले असून सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण चंद्रपूर  कार्यालयाचा ई-मेल आय डी chandrapurobc@gmail.com  हा असून कार्यालयाचे ऑनलाईन पत्रव्यवहार सदर ई-मेल आय डी वर करण्यात यावा, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी कळविले आहे.  

०००००

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. २ :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता  मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थी असतील त्यांनी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्वअटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.

००००००

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मृतकाचे वर्णन :  अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्षरंग काळा सावळाचेहरा-लांबटडोक्याचे केस बारीक पांढरेदाढी मिशीचे केस पांढरेउजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेलाअंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्टसिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम.

०००००००

Wednesday, 1 May 2024

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन





 

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन

चंद्रपूर दि. 1 : महाराष्ट्र दिनानिमित्त (1 मे) मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या हस्ते पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छापर संदेशात जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. नुकताच आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला. 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळेच गत निवडणुकीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम (आय.पी.एस.) यांनी पोलिस पथसंचलनाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी परेडचे निरीक्षण करून उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व इतर अधिका-यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. श्वेता सावळीकर यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तबाबत शपथ दिली.

कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम आवळे आणि पोलिस हवालदार मंगला आसुटकर यांनी केले. तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी मानले. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००००