Search This Blog

Wednesday, 25 November 2020

बार्टीतर्फे युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना 50 हजार आर्थिक सहाय्य

 बार्टीतर्फे युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना 50 हजार आर्थिक सहाय्य

 

Ø  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी  बार्टीच्या संकेतस्थळावर अर्ज करावे

 

चंद्रपूर, दि. 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारी व प्रशिक्षणाकरिता दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते.  संघ लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 दि. 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली व परीक्षेचा निकाल दि. 23 ऑक्टोंबर रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.

                 यावर्षी सन 2020 मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत तसेच बार्टीच्या पात्रतेचे निकष पूर्ण करीत आहेत, अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी रक्कम रुपये पन्नास हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

                 बार्टीमार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून अर्ज डाउनलोड करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ईमेलवर दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठवावे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले असल्याचे चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.

0000

Tuesday, 24 November 2020

गत 24 तासात 285 कोरोनामुक्त



 गत 24 तासात 285 कोरोनामुक्त

199 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू


Ø  आतापर्यंत 16,910 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,780

 चंद्रपूर, दि. 24 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 285 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 199 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 977 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 910 झाली आहे. सध्या एक हजार 780 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 547 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 19 हजार 486 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील 29 वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 287 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 267, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे नियोजन परिपुर्ण


 चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे नियोजन परिपुर्ण

Ø   संभाव्य दुसऱ्या कोरोना लाटेवर जिल्हाधिकारी यांचे कोरोना टास्क समितीला निर्देश

Ø  ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड व व्हेन्टीलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध

Ø  दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात येथून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोरोना तपासणी

 

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : कोरोना महामारीसंदर्भात युरोपात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यात देखील दुसऱ्या लाटेची भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोविड रुग्णसंख्येच्या दहा टक्के अधिक रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याबाबत कोरोना टास्क समितीची बैठकीत यंत्रणेला निर्देश दिले आहेत.  

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना टास्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबाबत मनपा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. सध्या सुरू असलेले कोविड रुगणालये व तेथील मनुष्यबळ कमी न करता आहे तसेच सुरू ठेवण्याबाबत व सर्व रुग्णालयात आवश्यक औषधीचा मुबलक प्रमाणात साठा करून ठेवण्याविषयी त्यांनी यंत्रणेला कळविले. तसेच शासनातर्फे लस उपलब्ध झाल्यास त्याचा साठा करण्यासाठी आवश्यक तापमानाचे फ्रीजरच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.  शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी 20 किलो लीटर लिक्वीड ऑक्सीजन टँक लवकरात लवकर प्रस्थापीत करून सुरू करण्याविषयी अधिष्ठाता यांना सूचीत केले असता दोन्ही ठिकाणी लिक्वीड टँक लागले असून शासकीय रुग्णालयील ऑक्सीजन टँक येत्या पाच सहा दिवसात पुर्ण क्षमतेने सुरू होईल असे अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1780 ॲक्टीव रुग्णसंख्या आहे. तर कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याच्या दृष्टीने 5454 ॲक्टीव रुग्णसंख्येचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 2182 होम आयसोलेशनमध्ये, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण 2454, ऑक्सीजन खाटांची आवश्यकता असणारे 654, व्हेंटीलेटर वरील 82 व आयसीयुतील 82 रुग्णसंख्या असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

वरील अपेक्षीत रूग्णसंख्येप्रमाणे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी 1977 खाटा उपलब्ध असून 477 खाटांची कमतरता पडेल, मात्र ही कमतरता लवकरच भरून काढण्यात येईल. ऑक्सीजन खाटांची मागणी 654 अपेक्षीत आहे, त्या तुलनेत 823 खाटा उपलब्ध आहेत. तर व्हेंटीलेटर 82 अपेक्षीत असतांना 96 उपलब्ध आहेत. आयसीयु खाटांची संख्या 82 अपेक्षीत असतांना त्या 153 उपलब्ध आहेत.

जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 450 खाटांचे कोविड रूग्णालय प्रस्तावित आहे. त्यापैकी 50 ऑक्सीजन व 50 आयसीयु सह एकूण 100 खाटा स्थापित झाल्या असून उर्वरित 350 खाटांचे काम प्रगतीपथावर आहे व ते लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तसेच सैनिक शाळा येथे कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये 400 ऑक्सीजन खाटांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून ऑक्सीजन पाईपलाईन व इतर साहित्य सामुग्रीची निविदा प्रक्रीया सुरू आहे. आवश्यकता भासल्यास या 400 खाटा देखील तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून सध्या  7 कोविड रुग्णालये आहेत. तर 14 पैकी 12 कोविड हेल्थ केअर सेंटर व 23 पैकी 16 कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या सेंटरमध्ये रुग्ण नाहीत ते पुर्णपणे बंद करण्यात आलेले नसून रुग्णसंख्या वाढल्यास तेथेही उपचार सुरू करण्यात येतील.

            जिल्हयात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रयोगशाळेत नियमित स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. फ्ल्यु सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण करून शहरी व ग्रामीण भागात फिवर क्लिनिकव्दारे आयएलआय रुग्ण शोधुन त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहे. पॉझीटिव्ह केसेसची जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्यात येत आहे.

दुसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने सुपर स्प्रेडर व्यक्तीची अतिशय महत्वाची भुमिका असल्यामुळे छोटे व्यवसायिक गट, घरघुती सेवा पुरविणारे, वाहतुक व्यवसायिक लोक, वेगवेगळी काम करणारे मजुर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर व इतर कर्मचारी, हाउसिंग सोसायटी मध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय, निमशासकीय तसेच पोलीस व होमगार्ड इ. जनसंपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करून प्राधान्याने सदरील व्यक्तींची प्रयोगशाळा तपासणी करण्याचे नियोजन करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात येथून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करण्याबाबत शासनाच्या सूचना असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे ज्या प्रवाशांकडे प्रवासाच्या 96 तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट नसतील त्यांची रेल्वे स्थानकार तपासणी करण्यात यावी. कोरोना सदृष्य लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. यासाठी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर तपासणी पथक नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी रिपोर्ट येईपर्यंत संबंधीत प्रवाशाला कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यास गृह विलगीकरणाचा पर्याय देखील खुला असेल तसेच पॉझेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनास देउन कॉन्टॅक्ट ट्रेसीगद्वारे संबंधीतांना सूचित करण्याचे नियोजन अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यंत्रणेला दिले.

 

0000

आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

 आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर निवडणूक 2020 चा कार्यक्रम दि.2 नोव्हेंबर 2020 पासून दि. 7 डिसेंबर 2020 पर्यंत असल्यामुळे नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे माहे डिसेंबर 2020 या महिन्यातील पहिल्या सोमवारी आयोजित लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही.

शासन परिपत्रक दि.26 सप्टेंबर 2012 मधील मुद्दा क्र.5.7 मधील नमूद तरतुदीनुसार ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत माहे डिसेंबर 2020 महिन्याच्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे, निवासी उप जिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.

00000

बेरोजगार युवकांना शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

 बेरोजगार युवकांना शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

 

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर:  बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चंद्रपूर येथे दि. 1 डिसेंबर 2020  ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत नि:शुल्क शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी कार्यालयामध्ये नोंदणी करावी. यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रोजगार हमीच्या कामावर असल्यास त्याची प्रत, बीपीएल दाखला, चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेशन कार्डची प्रत, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, इ. कागदपत्रासह बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जुन्या डीएड कॉलेज च्या बाजूला,रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली बायपास बल्लारशा रोड बाबुपेठ, चंद्रपूर येथे उपस्थित रहावे.

प्रशिक्षणार्थी हा 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावा व कमीत कमी 8वा वर्ग पास असावा. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उद्योगधंद्यांसाठी कार्यक्रम दर आठवड्यात किंवा दर महिन्यात आयोजित केले जातात. सदर प्रशिक्षण निशुल्क असून प्रशिक्षणार्थ्यांकरिता राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील निशुल्क करण्यात आली आहे.

            तरी ग्रामीण भागातील इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घेवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून  स्वतःचा उद्योग चालू करावा. प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी 8055936942 व 9403236285 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मनोज सोनकुसरे यांनी केले आहे.

000000