Search This Blog

Wednesday, 28 April 2021

शोक - संदेश काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला...विजय वडेट्टीवार

 


शोक - संदेश

 काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला...विजय वडेट्टीवार

 काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे - विजय वडेट्टीवार

मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी  मंत्री  व माजी खासदार सन्माननीय एकनाथ गायकवाड  यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे,  अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन एकनाथ गायकवाड  यांना श्रद्धांजली वाहिली.

 मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, काँग्रेसचे नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड  यांच्या निधनाची वार्ता एकताच अतीव दु:ख झाले.  एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती.  काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या स्व. गायकवाड यांचे  निधन ही महाराष्ट्राची आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

  त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठीण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000000

गृह विलगीकरणातील रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांनी प्रशासनाकडे नोंदणी करण्याचे आवाहन

 गृह विलगीकरणातील रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या

डॉक्टरांनी प्रशासनाकडे नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांकरिता गृह विलगीकरण सर्वोत्तम पर्याय आहे. गृह विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून नवीन रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गृह विलगीकरणातील या रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या सेवाभावी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोल रूमला आपली माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

  तरी इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली नोंदणी करण्यासाठी कंट्रोल रूमला 07172-274173 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

0000000

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार.. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा !

 

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार..

 महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा !

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना

प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय ...

मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱयांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी दिले आहेत.

    कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्ध पातळीवर संघर्ष सुरु आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी  दिवसरात्र लढत आहेत. स्वतःहाची  कुटुंबाची पर्वा नकरता सेवा आहेत. ही सेवा देताना त्यांच्याकडे पुरेसे  प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व   पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र (Oxygen concentrator), २७ ISO TANKS, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडीसीवर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

 कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. आपल्या देशाला संकट नवीन नाही, या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

     अधिक माहिती देताना ते म्हणाले, प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले.

0000000

Tuesday, 27 April 2021

गत 24 तासात 1603 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1603  कोरोनामुक्त,

1311 पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू

Ø  आतापर्यंत 39,318 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,534

चंद्रपूर, दि. 27 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1311 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 हजार 318  झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज  चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, तुकूम येथील 60 वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, दादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1311 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 116 बल्लारपूर 44, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 75, नागभिड 80, सिंदेवाही 72, मूल 46, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 23, राजूरा 40, चिमूर 35, वरोरा 68, कोरपना 122, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करा - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 






निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करा

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

चंद्रपूर दि. 27 एप्रिल :  कोरोना संकटाच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपाययोजना तातडीने करून घ्याव्यात. तसेच वैद्यकीय रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना वैद्यकीय सुविधेचा लाभ लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत  जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश  धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते,  उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणीक प्रयत्न करत  आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नागरिकांनी लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, शासनाने घालून दिलेले नियम पाळावे. जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत मिळेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले.

विजय वडेट्टीवार :

दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहेत. त्यामुळे खाटांची संख्या देखील वाढवावी लागत आहे. त्यातच रुग्णांना विहित वेळेत ऑक्सिजन मिळावा त्यासाठी स्त्री रुग्णालयात 20 केएल क्षमतेचे ऑक्सीजन टॅंक उभारण्यात आले आहे. त्यातच जिल्ह्यात दैनंदिन आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून या रोगाचा प्रसार इतरत्र होणार नाही. अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

 जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने वरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात 400 बेड वाढवून देण्याची कार्यवाही केलेली आहे.

 तसेच जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता तो भरून काढण्यासाठी  1,500 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी यावेळी  दिली.

 यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य समस्या तातडीने सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती केली.

वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी चंद्रपूर जिल्ह्यात निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला भेट देत सदर इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी  केली. विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षण घेता यावे तसेच नागरिकांना आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी उत्तम दर्जाची इमारत उभारण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळावा तसेच जिल्ह्यातील व बाहेरून येणाऱ्या  नागरिकांना उपचाराकरिता या वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यामुळे दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोयीचे होणार आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी  व्यक्त केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य असे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे वसतीगृह, अग्निसुरक्षा व्यवस्थेची परिपूर्ण माहिती प्रोजेक्ट इन्चार्ज विनोद कुमार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली.

स्त्री रुग्णालयाला भेट देत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची श्री अमित देशमुख यांनी पाहणी करून माहिती घेतली.तसेच मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवक  घ्यावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.

0000000