Search This Blog

Tuesday, 11 August 2026

13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन

 13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन

          चंद्रपूर, दि.11 :  17 वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा ही 20 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत राहुरी जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हातील 17 वर्षाखालील मुला/मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक हायस्कुल, जिल्हा स्टेडीयम होणार आहे.

खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 नंतरचा असावा. (जन्म दाखला आवश्यक). निवड चाचणी करीता स्वत:ची किट आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो- 2 अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अहवान टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव विशाल चव्हाण यांनी केले आहे.

००००००

पशुसंवर्धन विभागात मिनी ट्रकसाठी निविदा आमंत्रित

 पशुसंवर्धन विभागात मिनी ट्रकसाठी निविदा आमंत्रित

चंद्रपूर, दि. 11 : जिल्हाअंतर्गत व जिल्ह्याबाहेर आवश्यकता भासल्यास पर प्रांतातून लागणारे द्रवनत्र व विर्यमात्रा वाहतुकीकरिता एका वर्षासाठी 2.25 ते 3 टन क्षमता (तत्सम क्षमतेचे मिनी ट्रक) असलेल्या मिनी ट्रकसाठी कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.

वाहतुकीबाबत संपूर्ण तपशिल व निविदा संबंधी सविस्तर अटी व शर्ती आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, चंद्रपुर यांचे कार्यालय आणि http://chanda.nic.in या संकेतस्थळावर बघावयास मिळतील. दरपत्रके भरण्याची मुदत 10 ते 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरपत्रके उघडण्यात येतील.

इच्छुक कंत्राटदारांनी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत आपली सीलबंद पत्रके या कार्यालयास सादर करावी. दरपत्रके प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करण्याचा अथवा त्यामधील कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा अधिकार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, चंद्रपुर यांनी राखून ठेवलेला आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सुरेशकुमार कुंभरे यांनी कळविले आहे.

००००००

14 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 14 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

            चंद्रपूर, दि.11 : जिल्ह्यातील 10 वी, आयटीआय पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे

            सदर मेळाव्यामध्ये एकूण 22 पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीत्सह (कमीत कमी तीन प्रती उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्याकरीता पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

००००००

Monday, 10 August 2026

चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टो. ते 17 ऑक्टो दरम्यान सैन्य भरती



चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टो. ते 17 ऑक्टो दरम्यान सैन्य भरती

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 10 : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुल येथे 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सैन्य भरती रॅली (अग्निवीर भरती) आयोजित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेचा नुकताच आढावा घेतला. यावेळी सैन्य भरती कार्यालय, नागपूरचे डायरेक्टर कर्नल अंशित श्रीवास्तव, सुभेदार राजेंद्र सिंह, हवालदार ओम शिव कुमार, प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.

सैन्य भरती रॅलीसाठी आवश्यक बाबीवर तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या युवकासांठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कर्नल अंशित श्रीवास्तव यांनी सैन्य भरती करीता लागणारे साहित्य, येणाऱ्या अडचणी, जिल्हा प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य याबाबत सादरीकरण केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, भरती प्रक्रीयेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विसापूर स्टेडीयम उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेशी समन्वय साधून साफसफाई, लाईटस व जनरेटरची व्यवस्था करावी.  सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पुरेशी कुमक उपलब्ध करून द्यावी. भरती केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखावी. उमेदवारांची मोठी गर्दी  झाल्यास गर्दीचे नियोजन व नियंत्रण करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भरती केंद्रावर येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने भरती केंद्र, मैदान, प्रवेशद्वार व इतर आवश्यक ठिकाणी तात्पुरता अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा. सर्व विद्युत वाहिन्या, खांब, मीटर व जोडण्या सुरक्षित असल्याची तपासणी करावी.

सैन्य भरती दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने रस्ते व संपूर्ण परिसराची स्वच्छता व साफ-सफाई जबाबदारी पार पाडावी. शहरातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या युवकांसाठी स्टेडिअममध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चार रुग्णवाहिका प्रथमोपचार साहित्य व आवश्यक जीवनरक्षक उपकरणांसह उपलब्ध करून द्यावी. उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तसेच आवश्यक सुचना स्थानिक भाषेत प्रसारीत करण्यासाठी शिक्षण विभागाने 10 शिक्षकांची नियुक्ती करावी, अशा  सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

००००००

‘त्या पोषण आहाराचा’ पहिला अहवाल चांगला


‘त्या पोषण आहाराचा’ पहिला अहवाल चांगला 

Ø फेरतपासणीचा अहवाल 3 महिन्यांनी उशिरा

Ø उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि. 10 : महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाक कृतीनुसार अंगणवाडी केंद्रांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त संस्थेमार्फत करण्यात येतो. अंगणवाडी केंद्रात आहार प्राप्त झाल्यानंतर लगेच मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आहाराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोणतीही तफावत दिसून आली नाही. जानेवारी महिन्यात पोषण आहाराचा पहिला अहवाल चांगला आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे यांनी स्पष्ट केले.

वितरित करण्यात आलेल्या पूरक पोषण आहारातील नमुने, फेरतपासणीसाठी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंडपिपरी व बाल विकास प्रकल्प अधिकारी पोंभुर्णा यांच्या मार्फत 18 डिसेंबर 2025 रोजी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या 30 मार्च 2026 रोजीच्या तपासणी अहवालानुसार काही नमुन्यांबाबत निर्धारित निकषांनुसार नमुना अनुरूप नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नमुना स्वीकारल्याचा दिनांक व प्रत्यक्ष आहाराच्या तपासणीचा दिनांक यामध्ये तीन महिन्याचा कालावधी लोटला गेला. तसेच पोषण आहारातील गहू आणि तांदूळ भारतीय अन्न महामंडळ यांच्याकडून उपलब्ध होतो.

सदर अहवाल प्राप्त होताच महिला व बालविकास कार्यालयाने तात्काळ गोंडपिपरी आणि पोंभुर्णा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून आहाराच्या वितरणाबाबतची माहिती व अहवाल मागवून घेतला. प्राप्त अहवालांची तपासणी केली असता, सदर पूरक पोषण आहारामध्ये जिवंत किडे असल्याबाबत डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये कोणतीही तक्रार प्राप्त नाही, प्रयोगशाळा अहवाल 30 मार्च व 22 एप्रिल 2026 ला प्राप्त आहे.

बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका/पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांना आवश्यक त्या नियमित सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आहाराचा साठा, प्राप्तीच्या वेळी आहाराची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत, रंग, वास, चव व इतर दृश्यमान बाबींची तपासणी करूनच आहाराचे वितरण करणे तसेच संशयास्पद किंवा गुणवत्तेबाबत शंका असलेला आहार बालकांना वितरित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे, ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असून, आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका आढळल्यास ती तात्काळ संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास कळविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग, जि.प.) भागवत तांबे यांनी केले आहे.

००००००